ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी सरणावर बसून आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 16:24 IST2025-09-29T16:22:53+5:302025-09-29T16:24:09+5:30
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून ओला दुष्काळ जाहीर करावा

ओला दुष्काळ, कर्जमाफीसाठी सरणावर बसून आंदोलन; क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक
- दिलीप कावरखे
गोरेगाव (जि.हिंगोली) : अतिवृष्टीच्या माऱ्यात खरीप हंगाम हातचा गेला आहे. अशा परिस्थितीमुळे शेतकऱ्यांपुढे संकटाचा डोंगर उभा असताना सरकारकडून मात्र तातडीची पाऊले उचलली जात नसल्याचा आरोप करीत क्रांतीकारी शेतकरी संघटनेने २९ सप्टेंबर रोजी हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका ते येलदरी राज्य महामार्गावर स्वत:चे सरण रचत आंदोलन केले.
अतिवृष्टीच्या माऱ्यात शेतकरी गार झाला आहे. काढणीस आलेले सोयाबीन मातीत मिसळल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. शिवाय कापूस, तूर, हळदीसह इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले असून नदी- नाल्याकाठीच्या जमिनी पिकांसह खरडल्या आहेत. नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न वाहून गेले आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट हेक्टरी ५० हजार रूपये अनुदान द्यावे, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, पुरात वाहून गेलेल्या जनावर मालकांना तातडीची मदत करावी, या मागण्यासाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास कनेरगाव नाका ते येलदरी राज्य महामार्गावर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी एकत्र आले. या ठिकाणी महामार्गाच्या मधोमध सरण रचत त्यावर बसून आंदोलन करण्यात आले. यादरम्यान महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. नायब तहसीलदार अनिल सरोदे यांनी आंदोलनस्थळ गाठून निवेदन स्विकारले. या आंदोलनात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सकाराम भाकरे, गजानन जाधव, प्रवीण मते, विठ्ठल सावके, संदीप मानमोठे, अशोक कावरखे, दीपक सावके, गजानन काळे, दिनेश अंभोरे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.