हळदीचे दर पोहचले २३ हजारावर; चार दिवसानंतर वसमतच्या मोंढ्यात पुन्हा तेजी
By विजय पाटील | Updated: July 26, 2023 19:17 IST2023-07-26T19:16:51+5:302023-07-26T19:17:23+5:30
हळदीच्या १० हजार कट्ट्यांची आवक, वाढत्या दराने शेतकरी समाधानी

हळदीचे दर पोहचले २३ हजारावर; चार दिवसानंतर वसमतच्या मोंढ्यात पुन्हा तेजी
- इस्माईल जाहागिरदार
वसमत (जि. हिंगोली): कृऊबा बाजार समिती मोंढ्यात बुधवारी १० हजार कट्ट्यांची आवक झाली. बोली बिटात १० हजार ते २३ हजार रुपयांपर्यंत हळदीला दर मिळाला. यापूर्वीही बिटात हळद २२ हजार रुपयांवर हळद गेली होती. हळदीचे दर चार दिवसांपासून स्थिर होते. २६ जुलै रोजी झालेल्या बिटात सर्वाधिक दर हळदीस मिळाला. शेतकऱ्यांना वाढत्या दराचा फायदा होत आहे.
वसमत कृषी उत्पन्न बाजार समिती मोंढ्यात २६ जुलै रोजी हळदीच्या १० हजार कट्ट्यांची आवक झाली. बुधवारी रोजी हळदीचे बोली बिट झाले. बिटात दर्जेदार हळदीस १० हजार ते २३ हजार रुपयांचा दर मिळाला. शेतकरी राजू खंदारे (रा. रेडगाव) येथील शेतकऱ्यांच्या ६५ कट्टे हळदीस २१ हजार ५०० दर मिळाला आहे. तर अविनाश जाधव (रा. महागाव) येथील शेतकऱ्यांच्या हळदीस सर्वाधिक २३ हजार रुपयांचा दर मिळाला. यापूर्वीही २२ हजार १०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता.
योग्य दर मिळत आहे
मागील चार दिवस हळदीचे दर स्थिर होते. २६ जुलै रोजी मोंढ्यातील ठिकाण सर्वाधिक २३ हजार दर्जेदार हळदीस दर मिळाला. शेतकऱ्यांनी शेतीमाल बिटात विक्री करावा. मोंढ्यामध्ये शेतीमालास योग्य दर मिळत आहे.
-तानाजी बेंडे, सभापती, कृऊबा, वसमत.
यापुढेही दर वाढेल अपेक्षा...
दर्जेदार हळदीस उच्चांकी दर मिळत आहे. २६ जुलै रोजी झालेल्या बोली बिटात २२ कट्टे दर्जेदार हळद बिटात काढली होती. बिटात सर्वाधिक २३ हजार रुपयांचा दर मिळाला. यापुढेही दर वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
- अविनाश जाधव, शेतकरी, महागाव
समाधानकारक दर
मोंढ्यात हळदीचे ६५ कट्टे बिटात टाकले होते. हळद दर्जेदार होती. त्या प्रमाणात २१ हजार ५०० रुपयांचा समाधानकारक दरही मिळाला. हळदीस एवढा दर मिळेल असे वाटले नव्हते.
- राजू खंदारे, शेतकरी, रा. रेडगाव
जुलै महिन्यात वाढले हळदीचे दर....
३ जुलै रोजी हळदीस ९२३७ दर..
६ जुलै रोजी. १० हजार १०.
७ जुलै रोजी. ११ हजार ५००
१० जुलै रोजी. ११ हजार १११
११ जुलै रोजी. १५ हजार २५.
१५ जुलै रोजी. १९ हजार
१८ जुलै रोजी. १५ हजार ५००
१९ जुलै रोजी. २० हजार.
२० जुलै रोजी. २२ हजार
२४ जुलै रोजी. १५ हजार
२६ जुलै रोजी. २३ हजार