हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

By रमेश वाबळे | Published: March 7, 2024 07:46 PM2024-03-07T19:46:40+5:302024-03-07T19:47:29+5:30

नवी हळद येऊ लागली विक्रीला; मार्केटमध्ये आवक वाढली

Turmeric price hike in Hingoli Market; Relief to productive farmers | हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

हळदीला दरवाढीची झळाळी; उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

हिंगोली : गत महिन्यात सरासरी १२ ते १३ हजारांपर्यंत घसरलेल्या हळदीला ७ मार्च रोजी भाववाढीची झळाळी मिळाली. १४ हजार ३०० ते १७ हजार रुपये क्विंटलने हळदीची विक्री झाली, तर सरासरी १५ हजार ६१५ रुपये एवढा भाव राहिला. या दिवशी १ हजार १०० क्विंटल हळद विक्रीला आली होती.

मराठवाड्यासह सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या येथील संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबर २०२३ मध्ये हळदीला सरासरी १५ ते १६ हजारांचा उच्चांकी दर मिळाला होता. त्यानंतर मात्र दरात घसरण होत गेली. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये एक ते दीड हजारांची घसरण झालेली डिसेंबर, जानेवारीत कायम राहिली, तर फेब्रुवारीत सरासरी भाव १२ ते १३ हजारांपर्यंत घसरले. त्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेत हळद विक्रीविना ठेवलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली होती. मात्र, १ मार्चपासून सरासरी १४ हजारांवर भाव मिळत होता, तर ७ मार्च रोजी जवळपास एक हजार रुपयांची वाढ झाली. १ हजार १०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. १४ हजार ३०० ते १७ हजार रुपये प्रतिक्विंटलने हळद विक्री झाली. हळदीला भाववाढीची चकाकी मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, सध्या नवीन हळदीची आवक अत्यल्प आहे; परंतु जवळपास एक महिन्यानंतर आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या काळात भाव कायम राहावेत, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

सोयाबीन कावडीमोल दरातच...
यंदा सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशा कायम आहे. भाववाढीच्या प्रतीक्षेत मागील तीन ते चार महिन्यांपासून सोयाबीन विक्रीविना ठेवले. मात्र, भाव काही वाढता वाढत नसल्याचे चित्र आहे. सध्या सरासरी ४ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. घटलेले उत्पादन आणि भाव याचा विचार केल्यास लागवडही वसूल होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. येणाऱ्या दिवसांतही भाववाढीची शक्यता धूसर असल्याने शेतकऱ्यांवर मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करण्याची वेळ आली आहे.

हरभऱ्याचेही दर वाढले...
यंदा २०२३-२४ हंगामात शासनाने हरभऱ्याला ५ हजार ४४० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. एवढा भाव शेतकऱ्यांना मोंढ्यातही मिळत आहे. गुरुवारी मोंढ्यात १ हजार ३०० क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार १५० ते ५ हजार ६८० रुपयांदरम्यान भाव मिळाला. यंदा हरभऱ्याचा पेरा तब्बल १ लाख ५६ हजार ७५० एवढ्या क्षेत्रावर झाला होता. त्यामुळे जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.

तूर दहा हजारांवरच थांबली...
यंदा तुरीचे उत्पादन निम्म्याखाली आल्यामुळे किमान १२ हजारांवर भाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. फेब्रुवारी महिन्यात एक- दोन दिवस ११ हजारांपर्यंत तुरीला भाव मिळाला; परंतुु त्यानंतर भावात घसरण झाली. गुरुवारी मोंढ्यात ४५० क्विंटलची आवक झाली होती. ९ हजार ५०० ते १० हजार ४०० रुपये क्विंटलचा भाव मिळाला. भाव वाढण्याऐवजी कमी झाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

Web Title: Turmeric price hike in Hingoli Market; Relief to productive farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.