अपघातानंतर लोखंडी अँगल शरीरात घुसल्याने ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 15:33 IST2020-11-26T15:31:06+5:302020-11-26T15:33:51+5:30
ट्रकमधील लोखंडी अँगल पुढे घसरत येत समोरच्या कॅबीनला फोडून ड्रायव्हर आणि क्लीनरच्या शरीरात घुसले.

अपघातानंतर लोखंडी अँगल शरीरात घुसल्याने ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरचा जागीच मृत्यू
आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : चालकाचा ताबा सुटल्याने मालवाहू ट्रक रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्यामध्ये घुसला. त्यामुळे ट्रकमधील लोखंडी अँगल पुढे घसरत येत समोरच्या कॅबीनला फोडून ड्रायव्हर आणि क्लीनरच्या शरीरात घुसले. यात दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान नांदेड - हिंगोली रोडवरील दाती शिवारात घडली.
याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राम रहीम रोडवेज ट्रान्सपोर्ट कंपनीचा एक मालवाहू ट्रक ( एम .पी.9- एच. एफ. 7344 ) हैदराबाद येथून लोखंडी अँगल घेऊन इंदोरकडे जात होता. सकाळी साडेअकरा ते बारा वाजेच्यादरम्यान दाती शिवारातून जाताना चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात गेला. यामुळे ट्रकमधील लोखंडी अँगल वेगाने पुढे घसरले आणि ट्रकची कॅबीन फोडून बाहेर आले. हे अँगल ड्रायव्हर आणि क्लिनर यांच्या शरीरात घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच बाळापुर पोलीस ठाण्याचे सपोनि रवी हुंडेकर, बीट जमादार शेख बाबर, भगवान वडकिल्ले, संजय मार्के यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने अँगलखाली दबलेल्या ड्रायव्हर व क्लीनरला बाहेर काढले. मात्र त्यांच्या मृत्यू झाला होता. संजय मधुकर नेवले (वय 64 वर्षे राहणार बमोरी मोहल्ला इंदोर मध्यप्रदेश ) असे ड्रायव्हरचे तर सोनू शंकर राव (वय 35 वर्ष ,राहणार बमोरी मोहल्ला इंदोर )असे क्लीनरचे नाव असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी दिली.