थरारक! वसमत-आसेगाव मार्गावर वेगवान कार उलटली; एकाचा मृत्यू, ४ जणांची मृत्यूशी झुंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 16:29 IST2026-02-26T16:28:30+5:302026-02-26T16:29:09+5:30
वसमत-नांदेड मार्गावर कारचा भीषण अपघात; टाकळगाव जवळ कार रस्ता सोडून उलटली

थरारक! वसमत-आसेगाव मार्गावर वेगवान कार उलटली; एकाचा मृत्यू, ४ जणांची मृत्यूशी झुंज
वसमत (हिंगोली): वसमत-आसेगाव-नांदेड मार्गावर टाकळगाव जवळ गुरुवारी दुपारी कारचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगातील कार रस्ता सोडून उलटल्याने एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य चार तरुण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जण नांदेड येथील विजयनगर भागातील रहिवासी आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, कार वसमतकडून नांदेडच्या दिशेने वेगाने जात असताना टाकळगाव शिवारात चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. यामध्ये आशिष भासकरे (वय ४५, रा. विजयनगर, नांदेड) यांचा जागीच मृत्यू झाला.
४ तरुणांची प्रकृती चिंताजनक
अपघातात नितेश शंकरराव खंदारे (वय ३२), सिद्धांत सोपान सांगविकर (वय ३०), अन्वेश अशोक येडके (वय ३१) आणि आकाश अमृतराव डोकणे (वय २५, सर्व रा. विजयनगर, नांदेड) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे आणि अंबादास विभुते यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.
पुढील उपचारासाठी नांदेडला रवाना
स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी जखमींना तातडीने वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, सर्वांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे विजयनगर परिसरात शोककळा पसरली असून वसमत ग्रामीण पोलीस पुढील तपास करत आहेत.