हिंगोली जिल्ह्यात १३ टँकरवर भागतेय वीस हजार लोकसंख्येची तहान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2019 00:58 IST2019-03-03T00:57:49+5:302019-03-03T00:58:22+5:30
जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.

हिंगोली जिल्ह्यात १३ टँकरवर भागतेय वीस हजार लोकसंख्येची तहान
हिंगोली : जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.
जिल्ह्यात खासगी व तर शासकीय ४ टँकर सुरू आहेत. शासकीय टँकरपैकी दोन कळमनुरी तर दोन औंढा नागनाथ तालुक्यात सुरू आहेत. तर खासगी टँकरपैकी एक कळमनुरीत, आठ सेनगाव तालुक्यात सुरू आहेत. या सर्व टँकरवर ३४ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६९ खेपा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात २०९०९ लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात कळमनुरी- ४२१९, सेनगाव- १४५७० तर औंढ्यातील २१२० लोकसंख्येचा समावेश आहे. कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., सेनगाव तालुक्यात जयपूर, सेनगाव, कहाकर खु., तर औंढा तालुक्यात रामेश्वर, संघनाईक तांडा व काळापाणी तांडा येथे टँकर सुरू आहे. एकूण ७४ गावांसाठी अधिग्रहण केले. यात हिंगोलीत १७ गावांसाठी १७, कळमनुरीत १८ गावांत १९, सेनगावात १९ गावांत १९, वसमतला ८ गावांसाठी ९ व औंढ्यात १२ गावांसाठी १२ अधिग्रहणे केली आहेत. अजूनही विहिर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत.
बोअरचे ५६ प्रस्ताव
हिंगोली जिल्ह्यात नवीन बोअर घेण्यासाठी जि.प.कडून ५६ गावांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. तर दुरूस्तीचे १५ प्रस्ताव आले आहेत. अजून या प्रस्तावांची छाणनी झाली नाही. छाननीनंतर मंजुरीची कार्यवाही होणार आहे.
टंचाईत उपाययोजनांना गती नाही
हिंगोली जिल्ह्यात दरवर्षी टंचाईच्या काळात किरकोळ कारणांनी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे नशीब उजळत असते. एरवी देखभाल व दुरुस्तीवर निधी असूनही खर्च न करणाऱ्या जि.प.ला या काळात जाग येते. मात्र यंदा उपायांना गती मिळत नाही.