वसमत-परभणी मार्गावर कार-रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2025 12:36 IST2025-10-22T12:34:31+5:302025-10-22T12:36:44+5:30
या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत

वसमत-परभणी मार्गावर कार-रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू
-इस्माईल जहागिरदार
वसमत: परभणी मार्गावरील तेलगाव फाट्याजवळ मंगळवारच्या रात्री (२१ ऑक्टोबर) कार आणि ऑटो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
वसमत-परभणी मार्गावरील तेलगाव फाट्याजवळ २१ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास वसमतहून परभणीकडे जाणाऱ्या ऑटोचा आणि वसमतकडे येणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऑटोतील तीन प्रवासी जागीच ठार झाले. मृतांमध्ये ऑटोचालक गजानन रामराव चोपडे (वय ४०, रा. परभणी), महेश माधव कुळकर्णी (वय ४७, रा. परभणी) आणि बंडु माणिकराव भालेराव (वय ४२, रा. गुंडा) यांचा समावेश आहे.
या अपघातात ऑटोमधील अनिकेत इंगोले (रा. टेंभुर्णी) आणि यादव किशन गायकवाड (रा. परभणी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, कृष्णा चव्हाण, ताम्रध्वज कासले यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने नागरिकांच्या मदतीने जखमींना वसमत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी तात्काळ नांदेड येथे पाठवण्यात आले.
दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.