टेम्पो-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; दोन तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 16:05 IST2024-03-19T16:04:30+5:302024-03-19T16:05:45+5:30

आखाडा बाळापुर ते पोतरा रस्त्यावर झाला भीषण अपघात

Tempo-bike head-on crash; Death of two youths | टेम्पो-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; दोन तरुणाचा मृत्यू

टेम्पो-दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात; दोन तरुणाचा मृत्यू

आखाडा बाळापूर ( हिंगोली): पोतरा ते आखाडा बाळापूर रस्त्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचाही मृत्यू झाला. रंगराव सुदामराव मस्के आणि नागेश साहेबराव लेकुळे अशी मृतांची नावे आहेत. 

आज सकाळी दुचाकीस्वार रंगराव सुदामराव मस्के हा गाडीवर टोपले पुढे ठेवून बाळापुर कडून बोल्डा फाट्याकडे जात होता. त्याच्यासोबत दुचाकीवर पाठीमागे नागेश साहेबराव लेकुळे देखील बसलेला होता. सकाळी ११ वाजेच्या सुमारास समोरुन येणारा एक टेम्पो ( क्रमांक एम. एच. 40 - बी. एल. 1924 ) भरधाव वेगात बाळापूरकडे येत होता. आखाडा बाळापुर ते पोतरा या रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार  धडक झाली. 

या भीषण अपघातात दुचाकीस्वार रंगराव सुदामराव मस्के (वय 38 वर्ष , राहणार कुपटी, तालुका वसमत जिल्हा हिंगोली)  याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर पाठीमागे बसलेला नागेश साहेबराव लेकुळे ( वय 15 वर्षे , राहणार कुपटी)  हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान नागेशचा देखील मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच बीट जमादार मधुकर नांगरे , पंढरी चव्हाण तातडीने घटनास्थळी पोहोचले. टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेऊन बाळापूर पोलिस ठाण्यात आणले.

Web Title: Tempo-bike head-on crash; Death of two youths