वसमतमध्ये भरधाव कारचा झेंडा चौकात धुमाकूळ; तरुण गंभीर जखमी, चालक ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:43 IST2024-12-23T12:28:21+5:302024-12-23T14:43:10+5:30
वर्दळीच्या ठिकाणी अनियंत्रित कार चौकतील दुकानात शिरली, तसेच अनेक दुचाकींना धडक

वसमतमध्ये भरधाव कारचा झेंडा चौकात धुमाकूळ; तरुण गंभीर जखमी, चालक ताब्यात
वसमत: शहरातील झेंडा चौक भागात रविवारी रात्री चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने एकास उडवले. कार अंगावरून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे. तर चौकातील दुकान व दुचाकीचे मोठे नुकसान झाले. तर जखमीस रुग्णालयात घेऊन न जाता चालक कार सोडून घटनास्थळापासून पळून गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी रात्री उशिरा चालकाला ताब्यात घेतले आहे.
वसमत शहरातील वर्दळीचे ठिकाण आसलेल्या झेंडा चौकात २२ डिसेंबर रोजी रात्री ९:३० वाजे दरम्यान चालकाचे भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले. कार अनियंत्रित होऊन परिसरातील काही दुचाकी आणि दुकानांच्या समोरील भागावर धडकली. तसेच सय्यद इलियास ( ३५) या तरूणास कारने जोरदार धडक दिली. कारचे चाक दोनवेळेस अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी आहे.
माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी अपघातास्थळी धाव घेतली. जखमीस उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. तरूणाची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी त्यास नांदेड येथे रवाना करण्यात आले.
वसमतमध्ये भरधाव कारचा झेंडा चौकात धुमाकूळ; तरुण गंभीर जखमी, चालक पसार #hingolinews#marathwadapic.twitter.com/NWCdJKdZlP
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 23, 2024
दरम्यान,अपघात झाल्यानंतर चालक कार सोडून पसार झाला. दुकाने, दुचाकीचे मोठे नुकसान कारच्या धडकेत झाले आहे. तसेच गंभीर जखमी तरुणास रस्त्यावर तसेच सोडून चालक पसार झाल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. पोलीसांनी कार ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. रात्री उशिरा चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्दळीच्या ठिकाणी भरधाव वेगात वाहन चालविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.