Same picture everywhere; Cotton, turf destroy increased the crisis | सगळीकडे सारखेच चित्र; कापूस, तूर आडवी झाल्याने संकट वाढले
सगळीकडे सारखेच चित्र; कापूस, तूर आडवी झाल्याने संकट वाढले

- इलियास शेख 

कळमनुरी (जि. हिंगोली) : तालुक्यात पडलेल्या परतीच्या पावसाने खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असून, वर्ष कसे काढावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. गंजीतच सोयाबीनला बुरशी लागली असून, सगळीकडे सारखेच चित्र दिसत आहे. पाण्यात गेलेली पसर कुजल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

परतीच्या पावसाने ५३ हजार ९७ हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके पाण्याखाली गेली आहेत.  आत्महत्या अथवा स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याचे सेलसुरा येथील शेतकऱ्यांनी सांगितले.  शेतात  जावू वाटत नाही, असे उत्तम पाईकराव, विक्रम घुगे, ग्यानबाराव घुगे, बालाजी घुगे, चंद्रभागा घुगे आदींनी सांगितले. सोयाबीनच्या गंज्या आतून सडल्या व शेंगांना बुरशी आली. शेंगांना कोंब फुटत आहेत. झाकून ठेवलेले सोयाबीनही गेले. कापूस, तूर आडवी पडली आहे. तुरीचा फुलोरा झडला असल्याचे सेलसुरा येथील शेतात गेल्यानंतर दिसून आले. दोन दिवसांपूर्वी तहसीलच्या पथकाने पिकांचा सर्वे केला, सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी,  अशी मागणी कृष्णाजी घुगे, पुरूषोत्तम घुगे, चंद्रभागा घुगे यांनी केली.  एका शेतातील काढून ठेवलेले सोयाबीन जमा करत असलेल्या सरस्वती घुगे, लक्ष्मीबाई मुंडे, सारीका घुगे, सुमनबाई घुगे, गोकर्णा घुगे, जयश्री घुगे या महिलांनी सांगितले की, यावर्षीच्या पावसाने सर्वच पिकांची वाट लावली. पहिल्यादांच परतीच्या पावसाने एवढे नुकसान झाले. शासनाने त्वरित भरीव मदत करावी, असेही त्या म्हणाल्या. या परतीच्या पावसाने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. बियाण्याचेही पैसे निघणे शक्य नाही. जगणे कठीण झाले आहे. 
सेलसुरा येथील उत्तम पाईकराव यांच्या दोन एकर क्षेत्रावरील पिके  गेल्याचे त्यांनी सांगितले. वसपांगऱ्याचे शेषराव नागरे यांची ५ एकर  सोयाबीनची गंजी सडली.  पिकांचे पंचनामे झाले नाहीत. आपण ४ नोव्हेंबर रोजी तलाठ्याला भेटलो, परंतु त्यांनी माझ्याकडे १५ ते १६ गावे  आहे. मी सर्वे करण्यासाठी नंतर येतो, असे  सांगितल्याचे नागरे यांनी सांगितले.  


मुलाबाळांचे लग्न, शिक्षण, आजारपणासाठी पैसे आणावेत कोठून? 
मुलाबाळांचे लग्न, त्यांचे शिक्षण, आजारपण, खावे काय, जगावे कसे? अशा अनेक प्रश्नांचा भडीमारही शेताच्या बांधावर शेतकऱ्यांनी केला. या गावात ज्वारीचा पेरा अत्यल्प प्रमाणात आहे. सोयाबीन, कापूस ही मुख्य पिकेच हातची गेली आहेत. आता रबीच्या पिकावरच आमची भिस्त असल्याचे शेषराव नागरे, बबन नागरे यांनी सांगितले. 
 

Web Title: Same picture everywhere; Cotton, turf destroy increased the crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.