Hingoli: वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून 'वरात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 20:00 IST2026-01-13T19:58:28+5:302026-01-13T20:00:22+5:30
दरोडा टाकला, पसार झाले, पण पोलिसांच्या जाळ्यातून सुटू शकले नाहीत. पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Hingoli: वसमतमध्ये बँकेच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीची पोलिसांनी काढली भररस्त्यातून 'वरात'
वसमत: काही दिवसांपूर्वी वसमत येथील कोर्टा पाटी परिसरात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यवस्थापकाला लुटून पसार होणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. तपास प्रक्रियेसाठी या आरोपींना मंगळवारी (१३ जानेवारी) वसमत शहरात आणले असता, पोलिसांनी त्यांची शहरातून 'वरात' काढली. या कारवाईमुळे सामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
वसमत शहरातून आंबा चौंडी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेची रोकड घेऊन जाणाऱ्या बँक मॅनेजरवर अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला करून त्यांना लुटले होते. या धाडसी दरोड्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि आरोपींना तात्काळ ताब्यात घेतले.
अचानक वाहन बंद पडले अन्...
पकडलेल्या आरोपींना गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आणि घटनास्थळाच्या पंचनाम्यासाठी पोलिसांनी मंगळवारी वसमत शहरात आणले होते. मात्र, शहराच्या मध्यवस्तीत पोलिसांचे वाहन अचानक बंद पडले. वेळेचा विलंब टाळण्यासाठी आणि तपासाची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पोलिसांनी सर्व आरोपींना पायी चालवत नेण्याचा निर्णय घेतला.
बघ्यांची मोठी गर्दी आणि पोलिसांचा दरारा....
हथकड्या लावलेल्या दरोडेखोरांना भररस्त्यातून पायी नेताना पाहून वसमतकरांची मोठी गर्दी जमली होती. 'पोलिसांनी दरोडेखोरांची दिंडी काढली' अशी चर्चा संपूर्ण शहरात वाऱ्यासारखी पसरली. भरचौकातून या आरोपींना नेताना पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळाला.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून परिसरात असलेली दरोडेखोरांची दहशत संपुष्टात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि आरोपींना अशा प्रकारे शहरातून नेल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला आहे. "अशा कठोर कारवाईमुळेच गुन्हेगारीला आळा बसेल," अशी भावना सामान्य नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.