कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:05 IST2023-02-21T19:02:30+5:302023-02-21T19:05:26+5:30
कर्तव्य बजावताना नाशिक येथे अपघातात झाले होते जखमी; उपचारादरम्यान झाला मृत्यू

कर्तव्य बजावताना अपघातात जखमी पोलीस निरीक्षकांचा मृत्यू, मुळगावी झाले अंत्यसंस्कार
वसमत: पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने हे नाशिक येथे कर्तव्य बजावत होते. कर्तव्य बजावत असताना ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आला. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर त्यांना सोमवारी मृत्यूने कवटाळले. मंगळवारी वसमत येथिल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.
वसमत शहरातील रहिवासी असलेले पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने हे नाशिक येथे कार्यरत होते. नाशिकमधील एका चौकात कर्तव्य बजावत असताना दुचाकी बॅरिकेटला धडकली. ते बॅरिकेट पोलीस निरीक्षक गजानन सैंदाने यांच्या अंगावर येऊन पडले. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्यांच्यावर हैदराबाद येथे उपचार करण्यात आले. त्यानंतरही उपचारामध्ये प्रकृतीत सुधारणा झाली नाही.
२० फेब्रुवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला. वसमत येथील स्मशानभूमीत २१ फेब्रुवारी रोजी ३ वाजेदरम्यान त्यांच्यावर शासकीय इतमामात मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी असा परिवार आहे. अंत्यसंस्कारास राज्य भरातील अधिकारी कर्मचारी,त्यांचा मित्र परिवार उपस्थित होता.