पतंजली प्रमाणेच भारतीय कंपन्या आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'आपले सरकार' मधून विक्रीची परवानगी द्या - धनंजय मुंडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 14:35 IST2018-01-22T14:35:26+5:302018-01-22T14:35:46+5:30
आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल तर स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय आयुर्वेदिक कंपन्यांची आणि महिला बचत गटांची उत्पादनेही आपले सरकार मधून विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

पतंजली प्रमाणेच भारतीय कंपन्या आणि महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'आपले सरकार' मधून विक्रीची परवानगी द्या - धनंजय मुंडे
हिंगोली - आपले सरकारमार्फत पतंजलीची उत्पादने विकण्यास परवानगी देऊन सरकार पतंजली वर मेहेरनजर दाखवत आहे. एकाच खासगी कंपनीवर सरकारचे इतके प्रेम का ? आपले सरकार सेवा केंद्राचे दुकानच करायचे असेल तर स्पर्धात्मक निविदा काढून इतर भारतीय आयुर्वेदिक कंपन्यांची आणि महिला बचत गटांची उत्पादनेही आपले सरकार मधून विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
पतंजली या स्वतःच्या मर्जीतील खासगी कंपनीला 'आपले सरकार'ची केंद्र विक्रीसाठी देण्यापेक्षा या राज्यातील हजारो महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने या केंद्रातून विकली तर राज्यातील लाखो गरीब महीलांना रोजगार मिळाला असता , 3 वर्षांपासून महिला बचत गटांना बाजारपेठ देण्याच्या केवळ घोषणा दिल्या जात असल्याचे ते म्हणाले. पंतजलीला सवलतीत प्लॉट, सवलती आणि विक्री साठी दुकानेही दिली जात आहेत सरकार पतंजलीची भागीदार झाली की काय असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजलीच्या उत्पादनांना सरकारी सेवा केंद्रात स्थान देण्यात येणार आहे. ‘आपले सरकार’ सेवा केंद्रामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये आधार, पॅन, पासपोर्ट सेवेपासून निवडणूक आयोगाच्या सेवांचा समावेश आहे. त्यातच आता रामदेव बाबांच्या पतंजलीला ई-कॉमर्समध्ये खास स्थान देण्यात आलं आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाने शासन निर्णय जारी केला आहे. इतर उद्योजक आणि विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र विरोध दर्शवला आहे.