नर्सी नामदेव संस्थानमध्ये दिवाबत्ती करणाऱ्याने भासवले अध्यक्ष; कोट्यावधींचा केला अपहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:35 IST2023-04-07T16:35:23+5:302023-04-07T16:35:42+5:30
सन २००८ ते २०१७ या कालावधीमध्ये येथे दिवाबत्ती मंदिर साफसफाई करण्यासाठी पाच लोकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली.

नर्सी नामदेव संस्थानमध्ये दिवाबत्ती करणाऱ्याने भासवले अध्यक्ष; कोट्यावधींचा केला अपहार
- बापूराव इंगोले
नर्सी नामदेव (जि. हिंगोली): श्री क्षेत्र असलेले नर्सी नामदेव हे राष्ट्रीय संत नामदेवांचे जन्मस्थान म्हणून महाराष्ट्रासह देशभरात ओळखले जाते. या ठिकाणी संत नामदेव मंदिर संस्थान आहे. काही वर्षांपूर्वी संस्थांनसाठी दोन गटाचा वाद निर्माण होऊन तो हायकोर्टामध्ये सुरू होता. परंतु स्वयंघोषित अध्यक्ष असे भासवून दिवाबत्ती करणाऱ्या पाच लोकांपैकी एकाने कोट्यवधी रुपयांचा अपहार केला आहे.
सन २००८ ते २०१७ या कालावधीमध्ये येथे दिवाबत्ती मंदिर साफसफाई करण्यासाठी पाच लोकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्यात आली. यापैकी सतीश विडोळकर हे स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून या ठिकाणी काम करीत होते. दहा वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी बरेचसे काम हे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता केले. दरम्यान, त्यांनी सहा कोटीच्यावर रकमेची नोंद व्यवस्थित न ठेवल्याने त्यांच्याविरुद्ध हिंगोली सहायक धर्मादाय आयुक्त रवींद्र धायतडक यांनी नर्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचा आदेश दिला. त्यावरून संस्थान विश्वस्त अंबादास गाडे यांच्या फिर्यादीवरून नर्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास नर्सी ठाण्याचे सपोनि अरुण नागरे हे करीत आहेत.
३१ ऑगस्ट २००४ रोजी संस्थांनची कमिटी निर्माण करण्यात आली. त्यास आक्षेप आल्याने व हायकोर्ट औरंगाबाद येथे २००६ मध्ये या प्रकरणास स्थगिती मिळाल्याने मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम व दर्शनासाठी आलेल्या भाविकांची हेळसांड होऊ नये म्हणून धर्मादाय आयुक्त परभणी यांनी अर्ज मागविले. यानंतर येथील सतीश नरहरराव विडोळकर, विठ्ठल वाशिमकर, ग्यानबाराव टेमकर, भिकूलाल बाहेती, चंद्रमोहन तिवारी या पाच लोकांची नियुक्ती या ठिकाणी केली होती.
सदरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपात सेवा करण्यासाठी करण्यात आलेली होती. परंतु यातील विडोळकर हे स्वतःला स्वयंघोषित अध्यक्ष समजून घेत होते. तसेच त्यांच्याकडे सर्व आर्थिक व्यवहार देखील असल्याचे वरील तिघांनी जबाब दिला आहे. यामध्ये १० वर्षाच्या काळाखंडामध्ये नामदेवांची दानपेटी उघडणे, बोगस पावत्या फाडणे, बाहेरूनही मोठ्या प्रमाणात दान गोळा करणे याशिवाय नामदेव मंदिर संस्थांनची प्रॉपर्टी ही परस्पर दान करून देणे, पंढरपूर येथे जागा खरेदी करणे असे अनेक विनापरवाना कामे करून यामध्ये अंदाजे सहा कोटीच्यावर भ्रष्टाचार केला आहे. मात्र याचा दरवर्षीचा लेखाजोखा नोंदी या धर्मादाय कार्यालयात सादर केल्या नाहीत. मागणी करूनही त्यांनी मूळ संस्थानकडे अहवाल देखील सादर केलेला नाही. सदरील प्रकरणासाठी संस्थानचे उपाध्यक्ष भीकाजी कीर्तनकार, विश्वस्थ भागवत सोळंके व अंबादास गाडे यांनी २०१६ मध्ये धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज सादर केला. यावरुन हा निकाल आयुक्तांनी दिला आहे.