Hingoli will have to pay Rs 154 crore to compensate for excess rainfall | अतिवृष्टीच्या भरपाईपोटी हिंगोलीला लागणार १५४ कोटी

अतिवृष्टीच्या भरपाईपोटी हिंगोलीला लागणार १५४ कोटी

ठळक मुद्दे शासनाकडे अहवाल सादर आता प्रतीक्षा मदतीची

- सुनील काकडे 

हिंगोली : अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यांत २ लाख २७ हजार ६८ हेक्टरवरील जिरायती पिकांसह बागायत व फळपिकांचे नुकसान झाले. त्याचा एकत्रित अहवाल २२ आॅक्टोबरला शासनाकडे पाठविण्यात आला आहे. नुकसानग्रस्त ३ लाख ७ हजार ८३० शेतकऱ्यांना नुकसान ारपाई देण्याकरिता १५४ कोटी ७१ लाख ७३ हजार ५१८ रुपये एवढ्या निधीची गरज असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सतत कोसळलेल्या पावसामुळे मूग, उडीद आणि नंतर सोयाबीन, कापूस यासह बागायती व फळपिकांचे नुकसान झाले. नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे शेतात उभ्या सोयाबीनच्या हिरव्या शेंगांना कोंब फुटण्याचा प्रकारही घडला. दरम्यान, कृषी व महसूल विभागाने संयुक्तरित्या सर्वेक्षण व पंचनामे करून जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने कृषी आयुक्तांकडे नुकसानीचा अहवाल पाठविला आहे. 

अहवालानुसार, जून ते आॅक्टोबर या ५ महिन्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थितीमुळे २ लाख ४४९ हेक्टरवरील सोयाबीनचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. यासह २१ हजार ४३२ हेक्टरवरील कापूस, १८७८ हेक्टरवरील ज्वारी, ५.६० हेक्टरवरील तूर, १४१४ हेक्टरवरील मूग आणि १५२० हेक्टरवरील इतर अशा एकूण २ लाख २६ हजार ७०१ हेक्टरवरील जिरायती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ लाख ६ हजार ७४७ शेतकरी यामुळे बाधीत झाले असून संबंधितांना हेक्टरी ६८०० रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याकरिता १ अब्ज ५४ कोटी १५ लाख ६७ हजार ८८८ रुपये निधीची गरज आहे. बागायत पिकांखालील २२५ हेक्टरवरील हळद पिक बाधीत असून, ८७६ शेतकऱ्यांना १३ हजार ५०० रुपये प्रमाणे ३ कोटी ४५ लाख ३३० रुपये, फळपिकाखालील १४२ हेक्टरवरील केळी पिकाचे नुकसान झाले असून, त्यासाठी २ कोटी ५६ लाख रुपये लागतील.

आता प्रतीक्षा मदतीची
जून ते आॅक्टोबर या पाच महिन्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर सर्वेक्षण आणि पंचनामे करून अहवाल तयार केले आहेत. बाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: Hingoli will have to pay Rs 154 crore to compensate for excess rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.