Hingoli: 'पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?' जाब विचारणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 12:13 IST2025-11-20T12:12:12+5:302025-11-20T12:13:15+5:30
भटसावंगी येथे दगडाने मारहाणीत एकाचा खून

Hingoli: 'पत्नीला नांदायला का पाठवत नाहीत?' जाब विचारणाऱ्या तरुणाचा दगडाने ठेचून खून
हिंगोली : जाब विचारण्यासाठी घरी गेल्यानंतर झालेल्या भांडणातून एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना तालुक्यातील भटसावंगी येथे १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे.हरिदास सिताराम चवरे (३३, रा. भटसावंगी, ता. जि. हिंगोली) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेनंतर हरिदास यांचे भाऊ दत्ता सिताराम चवरे यांनी बुधवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून सविस्तर तक्रार दिली आहे. त्यावरून दोन जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिदास सिताराम चवरे हे त्यांची पत्नी वर्षा हिला नांदायला का पाठवत नाहीस, अशी विचारणा आरोपींना नेहमी करीत असत. त्यामुळे या संदर्भात बोलण्यासाठी आरोपी साहेबराव भिवाजी कपाटे आणि गोलू उर्फ शत्रुघ्न साहेबराव कपाटे (दोघे रा. भटसावंगी) हे हरिदास यांच्या घरी आले होते.
या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून भांडण वाढत गेले. याच भांडणातून आरोपींनी दगडाने मारहाण करून हरिदास सिताराम चवरे यांचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून आरोपी साहेबराव कपाटे व गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे या दोघांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विकास आडे अधिक तपास करत आहेत.