हिंगोलीत महसूल पथकावर वाळू माफियाने घातले ट्रॅक्टर, हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 14:24 IST2018-03-28T14:24:41+5:302018-03-28T14:24:41+5:30
बेरूळा शिवारात वाळूची अवैध वाहतुक रोखल्याने महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी आज सकाळी ९ च्या सुमारास हल्ला केला. यावेळी वाळू माफिया व महसूल पथकाच्या झटापटीत तलाठी विठ्ठल शेळके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.

हिंगोलीत महसूल पथकावर वाळू माफियाने घातले ट्रॅक्टर, हल्ल्यात तलाठी गंभीर जखमी
औंढा नागनाथ ( हिंगोली ) : बेरूळा शिवारात वाळूची अवैध वाहतुक रोखल्याने महसूलच्या पथकावर वाळू माफियांनी आज सकाळी ९ च्या सुमारास हल्ला केला. यावेळी वाळू माफिया व महसूल पथकाच्या झटापटीत तलाठी विठ्ठल शेळके यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.
तालुक्यात यावर्षी वाळूच्या एकाही घाटाचा लिलाव झाला नाही. यामुळे पूर्णा नदी पात्रात असलेल्या वाळू घाटावरून चोरीचे प्रमाण वाढले आहे. यावर कारवाईसाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांनी अवैध गौण खनिज उत्खनन पथक तैनात केले आहे. या पथकातील विठ्ठल शेळके, व्ही.व्ही. मुंढे, डी.एस.अंभोरे, व्ही.एस.पुरी, किशोर पलटनकर यांनी आज सकाळी बेरूळा नजीक असलेल्या पूर्णा नदीमधून अवैधरित्या वाळू घेऊन जाणार्या ट्रॅक्टरला अडवले. मात्र, चालकाने ट्रॅक्टर न थांबविता पथकाच्या वाहनाला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
या वेळी पथकाच्या वाहनचालकाने प्रसंगावधान राखून हि धडक चुकवली. यानंतर पथकातील शेळके व मुंढे यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत वाळू माफीयाने तिक्ष्ण हत्याराने शेळके यांच्यावर वार केले. यात त्यांच्या अंगावर व डोळ्यावर गंभीर मार लागला. हल्ल्याची माहिती तहसीलदार पांडुरंग माचेवाड यांना समजताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हल्ल्खोर वाळू माफियाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून औंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरु आहे.