Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 13:06 IST2025-10-11T13:05:54+5:302025-10-11T13:06:24+5:30
अतिवृष्टीच्या विशेष पॅकेजमधून दोन तालुके वगळल्याने संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत.

Hingoli: तुटपुंज्या मदतीचे पैसे उधळले; शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप
गोरेगाव (जि. हिंगोली) : अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले असताना शासनाकडून मात्र तुटपुंजी मदत दिली जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी १० ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयासमोरील रस्त्यावर पैसे उधळून शासनाच्या धोरणाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना याप्रश्नी आक्रमक झाली असून, अतिवृष्टीच्या विशेष पॅकेजमधून दोन तालुके वगळल्याने संतापाच्या भावना व्यक्त होत आहेत.
अतिवृष्टीने खरीप पिकांचे प्रचंड नुकसान होऊनही सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या विशेष मदत पॅकेजच्या यादीतून हिंगोली व सेनगाव दोन तालुके वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा झाली असताना या तुटपुंज्या मदतीवरून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी १० ऑक्टोबर रोजी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयासमोर मदतीचे पैसे उधळून देत निषेध नोंदविला.
यंदा सतत पाऊस व अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेकडो हेक्टर जमिनीमधील मातीसह शेती पिके खरडून गेली. बऱ्याच प्रमाणात घरांची पडझड झाली. सोयाबीनसह कापूस, तूर, हळद, उडीद, मूग आदी पिकांचे नुकसान झाले. असे असताना सरकारकडून काढण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विशेष मदत पॅकेजच्या यादीत हिंगोली जिल्ह्यातील तीनच तालुक्यांचा समावेश असून, हिंगोली व सेनगाव तालुक्याला वगळण्यात आले.
हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी हेक्टरी केवळ ८५०० रुपये देत ही मदत बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात ६० ते ७० टक्के नुकसान दर्शविले असल्याने शेतकऱ्यांच्या हातावर हेक्टरी केवळ साडेचार ते पाच हजार, तर कुणाच्या खात्यावर ७ हजार रुपये मदत मिळाली. त्यामुळे या तुटपुंज्या मदतीबद्दल शेतकरी तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. त्यातूनच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, प्रवीण मते, श्याम मते, गजानन काळे या पदाधिकाऱ्यांसह संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी गोरेगाव येथील अपर तहसील कार्यालयासमोर मदतीचे पैसे रस्त्यावर उधळून टाकीत विशेष मदत पॅकेजमधून सेनगाव, हिंगोली तालुक्यांना वगळण्यात आल्याने घोषणा देत निषेध नोंदविला.
सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये
अतिवृष्टीमुळे पैनगंगा व कयाधू नदीच्या पुरांमध्ये हिंगोली व सेनगाव तालुक्यातील शेत जमिनी खरडून गेल्या असून, खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यांना विशेष मदतीतून वगळत शेतकऱ्यांच्या हातावर तुटपुंजी मदत देऊन सरकारने शेतकऱ्यांची थट्टा करू नये. अन्यथा शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
-नामदेव पतंगे, जिल्हाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना