Hingoli: "मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा!" दहावीच्या धाडसी मुलीची मुख्याध्यापकांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 13:10 IST2026-01-20T13:08:32+5:302026-01-20T13:10:44+5:30
वसमतमध्ये बालविवाहाचा डाव उधळला.

Hingoli: "मला शिकायचंय, माझं लग्न थांबवा!" दहावीच्या धाडसी मुलीची मुख्याध्यापकांकडे धाव
- इस्माईल जहागीरदार
वसमत:"माझे वय अवघे १५ वर्षे आहे, पण घरच्यांनी माझं लग्न २५ वर्षांच्या तरुणासोबत ठरवलंय. मला आता लग्न करायचं नाही, मला खूप शिकायचंय!" काळजाचा थरकाप उडवणारी ही आर्त साद वसमत तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत उमटली. स्वतःचे लग्न मोडण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने थेट मुख्याध्यापकांकडे लेखी विनंती केल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
वसमत तालुक्यातील एका गावच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता १० वी मध्ये शिकणाऱ्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीचे लग्न तिच्या पालकांनी फेब्रुवारी महिन्यात निश्चित केले होते. मुलगी अल्पवयीन असताना आणि तिची शिकण्याची जिद्द असतानाही, कुटुंबियांनी तिच्या मनाविरुद्ध हे लग्न लावून देण्याचा घाट घातला होता. मात्र, या अन्यायाविरुद्ध गप्प न बसता, त्या मुलीने धाडस दाखवले आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना गाठून आपली कैफियत मांडली.
मुख्याध्यापक आणि प्रशासनाची तत्परता...
विद्यार्थिनीच्या विनंती अर्जाची गांभीर्याने दखल घेत मुख्याध्यापकांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून ग्रामविकास अधिकाऱ्यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली. या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि लग्न रोखण्यासाठी लेखी पत्रही देण्यात आले. या पत्राची दखल घेऊन आता ग्रामपंचायत स्तरावर बालविवाह रोखण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे.
मुलीच्या धाडसाचे कौतुक...
सहसा ग्रामीण भागात बालविवाहासारख्या प्रथांविरुद्ध बोलण्यास मुली धजावत नाहीत. मात्र, या १५ वर्षीय मुलीने समाजाची आणि घरच्यांची पर्वा न करता, स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. "शिक्षण हा माझा हक्क आहे," हा संदेश तिने आपल्या कृतीतून दिला आहे.
पालकांचे प्रबोधन करण्याची गरज...
बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार १८ वर्षांखालील मुलीचे लग्न लावणे हा गुन्हा आहे. आता प्रशासनाकडून संबंधित मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बालविवाहाचे दुष्परिणाम आणि मुलीच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन तिचे लग्न रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, "शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे. एका अल्पवयीन मुलीने दाखवलेले हे धाडस कौतुकास्पद असून, प्रशासन तिचे शिक्षण खंडित होऊ देणार नाही आणि हा बालविवाह रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.".