Hingoli: स्वयंपाक केला नाही म्हणून पतीचा संताप; पेट्रोल ओतून पत्नीस पेटवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 16:25 IST2025-10-28T16:23:09+5:302025-10-28T16:25:01+5:30
या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे

Hingoli: स्वयंपाक केला नाही म्हणून पतीचा संताप; पेट्रोल ओतून पत्नीस पेटवले
गोरेगाव (जि. हिंगोली) : स्वयंपाक केला नाही म्हणून पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील वलाना येथे २५ ऑक्टोबर रोजी घडली. यात गंभीर भाजलेल्या पत्नीवर अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेप्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वलाना येथील शेख अलीमपाशा शेख अल्लाबक्ष याने स्वयंपाक का केला नाही म्हणून पत्नी शाहीनबी शेख अलीम पाशा (२६) हिला शिवीगाळ केली. यादरम्यान बाटलीमधील पेट्रोल तिच्या अंगावर ओतून पेटवून दिले. आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांना तातडीने अकोला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहानबी शेख ६० टक्के भाजल्याची माहिती आहे. याप्रकरणी शाहीनबी शेख अलीम पाशा यांच्या जबाबावरून २७ ऑक्टोबर रोजी शेख अलीमपाशा शेख अल्लाबक्ष याच्याविरुद्ध गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. अधिक तपास पोलिस निरीक्षक विनोद झळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.