Hingoli: कौटुंबिक वादातून वडिलांचा खून; दोन्ही मुलांना आजीवन कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 14:40 IST2025-11-25T14:37:19+5:302025-11-25T14:40:01+5:30
सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास करून हिंगोली येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Hingoli: कौटुंबिक वादातून वडिलांचा खून; दोन्ही मुलांना आजीवन कारावास
हिंगोली : कौटुंबिक वादातून वडिलांचा खून करणाऱ्या दोन्ही मुलांना येथील तदर्थ जिल्हा न्यायालयाने आजीवन कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २४ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.
सेनगाव तालुक्यातील पानकन्हेरगाव येथे ही घटना घडली होती. या प्रकरणात ६ जून २०२२ रोजी शिवाजी आबाराव देशमुख यांनी सेनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार संजय आबाराव देशमुख यास त्यांची दोन मुले निखिल संजय देशमुख (२९) आणि गजानन संजय देशमुख (२४) यांनी जुन्या कौटुंबिक वादातून वेळूची काठी, राफ्टर, लाकडी पाटाने मारहाण केली. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार दिली होती. त्यावरून सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणाचा तपास करून हिंगोली येथील जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
२४ नोव्हेंबर रोजी तदर्थ जिल्हा न्यायाधीश १ पी. जी. देशमुख यांच्या न्यायालयासमोर हे प्रकरण चालले. न्या. पी. जी. देशमुख यांनी निखिल संजय देशमुख व गजानन संजय देशमुख या दोघांना दोषी ठरवित कलम ३०२ भा.दं.वि. प्रमाणे आजीवन कठोर कारावास तसेच प्रत्येकी ५ हजार रुपये दंड, कलम २०१ सहकलम ३४ भा.दं.वि.प्रमाणे ३ वर्षे कठोर कारावास तसेच प्रत्येकी ५०० रुपये दंड, कलम ५११ सहकलम ३४ भादंविप्रमाणे १० वर्षे कठोर कारावास तसेच प्रत्येकी २ हजार रुपये दंड आणि एकूण आकारण्यात आलेल्या १५ हजार रुपये दंडापैकी १० हजार रुपये मयताची आई लक्ष्मीबाई आबाराव देशमुख यांना भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी वकील एस. एस. देशमुख यांनी बाजू मांडली. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. कुटे यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी म्हणून पोलिस कर्मचारी पी. ए. मारकड यांनी सहकार्य केले.