नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ACB Raid; करसहायक २० हजारांची लाच घेताना अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:46 IST2026-01-01T18:45:29+5:302026-01-01T18:46:22+5:30
व्यावसायिक कर, त्यावरील व्याज आणि दंड रद्द करण्यासाठी मागितली नोटिस

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ACB Raid; करसहायक २० हजारांची लाच घेताना अटकेत
हिंगोली : व्यावसायिक कराची (प्रोफेशनल टॅक्स) नोटीस रद्द करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना वस्तू व सेवा कर विभागाच्या कर सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले आहे.
उमेश साहेबराव सरकटे असे पकडलेल्या कर सहायकाचे नाव आहे. यासंदर्भात तक्रारदाराने ३१ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदारास ३१ मार्च २०२५ पर्यंतचा व्यावसायिक कर, त्यावरील व्याज आणि दंड असे मिळून एकूण ४३,९०४ रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस घेऊन उमेश सरकटे २९ डिसेंबर रोजी तक्रारदाराच्या दुकानावर गेले होते. "तुम्हाला आलेली नोटीस मी रद्द करू शकतो. जर तुम्हाला ४३,९०४ रुपये भरायचे नसतील, तर त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील," असे म्हणत त्यांनी लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३१ डिसेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या बाजूस असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर उमेश सरकटे यांनी तडजोडीअंती पंचांसमक्ष २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
झडती आणि पुढील तपास
आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २९५० रुपये रोख, आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, अंगठी आणि एक मोबाइल असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आरोपी उमेश सरकटे यांच्या रिसोड येथील घराची झडती घेण्याचे आदेश वाशिम येथील ‘एसीबी’च्या पोलिस निरीक्षक अलका गायकवाड यांना देण्यात आल्याची माहिती ‘एसीबी’ने दिली आहे.