हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 15:50 IST2025-08-09T15:45:00+5:302025-08-09T15:50:01+5:30
हिंगोली जिल्ह्यातील सहा मंडळांत अतिवृष्टी

हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस; भगवती, वरूडचक्रपानजवळील पुलावरून पाणी
हिंगोली : गुरुवारी रात्री शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा व वरूडचक्रपान येथील कयाधू नदीच्या पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे दोन्ही पुलांवरील वाहतूक दुसऱ्या ठिकाणावरून वळविण्यात आली.
गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगामातील पिके माना टाकत होती. परिणामी शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला होता. ७ ऑगस्ट रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे ओढे, नाले व इतर छोट्या-मोठ्या नद्यांना पूर आला, तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतशिवारात पाणी शिरले होते. परिणामी खरीप पिके पाण्याखाली गेली. हिंगोली शहरातील कयाधू नदीही भरून वाहत होती.
सहा मंडळांत अतिवृष्टी
जिल्ह्यातील नर्सी नामदेव १०७ मिमी, कळमनुरी ७० मिमी, वाकोडी ११५.८ मिमी, नांदापूर ८७ मिमी, वारंगाफाटा ८३ मिमी, सेनगाव मंडळात ७४.८ मिमी पाऊस झाला.
भगवती गावाच्या पुलावरून पैनगंगेचे पाणी...
कडोळी (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील भगवती गावाजवळून वाहणाऱ्या पैनगंगा नदीला गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूर आला. त्यामुळे एसटी बस व इतर जड वाहनांना या ठिकाणावरून प्रवेशबंदी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आला होता. परिणामी, भगवतीजवळील जुन्या पुलावरून चार ते पाच फूट पाणी वाहत होते. पुराची स्थिती पाहून लगेच जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली; परंतु मोटारसायकल, ऑटो रिक्षांना या ठिकाणावरून जाऊ दिले जात होते.