"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 01:41 PM2024-03-12T13:41:47+5:302024-03-12T13:49:07+5:30

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही.

"Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again | "फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

"फडणवीसांच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाही"; जरांगे पुन्हा कडाडले

हिंगोली - देशाती लोकसभा निवडणुकांची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने राजकीय नेते युती व आघाडीच्या जागावाटपात व्यस्त आहेत. दुसरीकडे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा विराट सभा घेणार असल्याचे सांगत, दौरा सुरू आहे. हिंगोली येथील दौऱ्यात जरांगेंनी पुन्हा एकदा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. एसआयटी चौकशी नेमल्यावरुन संताप व्यक्त करत, मराठे तुमच्या डोक्याला आयुष्यभर गुलाल लागू देणार नाहीत, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांवर टीका केली. तर, बीडमधील जाळपोळीच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलं.  

महायुती सरकारने मराठा समाजाला दिलेलं १० टक्के आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणारं नाही. त्यामुळे सरकारने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे. लोकसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा एकदा मराठा समाजाची विराट सभा होणार असून त्यासाठी ९०० एअरची जागा पाहण्याचं काम सुरू असल्याचंही जरांगेंनी बीडमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर, आता हिंगोली दौऱ्यात असताना जरांगेंनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं. 

राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटी चौकशीवर बोलताना, दूध का दूध, पाणी का पाणी होऊ द्या, पण तसं होणार नाही. बारा बलुतेदार असू द्या, गोरगरीब जनता असू द्या, सगळे गुतणार. पण, मराठे भीतच नाहीत गुतायला. तुम्ही एसआयटी नेमलीय ना, आता राज्यात दुषित वातावरण झालंय. नाराजीची प्रचंड लाट आली आहे, तुम्हाला भावनिक लाट काय असते, आणि आयुष्यात केलेली चूक किती महागात पडेल हे फडणवीसांच्या लक्षात येणार आहे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. तसेच, कायम राजकीय आयुष्यातून बरबाद होणार, तुम्ही किती खुनशी आहात हे आम्हाला माहिती आहे. पण, मराठे एवढे खुनशी आहेत की, आयुष्यभर तुमच्या डोक्याला गुलाल नाही लागू देणार, असेही जरांगे यांनी म्हटलं आहे. 

बीडमधील ते लोकं कुठं गेली? - जरांगे

तुम्हीच आमच्या विरोधात आंदोलनं बसवली, त्याला पैसेही पुरवले आहेत. बीडमधील हॉटेल कुणी जाळलंय, त्या हॉटेलमधून पडलेले लोकं कोणत्या दवाखान्यात गेले आहेत, आत्तापर्यंत त्यांचा मेळ नाही. हॉटेल जाळणारे लगेच पडले, तिथे अॅम्ब्युलन्स होती, त्यातून ते रुग्णालयातही गेले, मग ते तिथून कुठं गेले, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. 

 

Web Title: "Gulaal will not be applied to the head of Fadnavis for the rest of his life"; Manoj Jarange was stiff again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.