आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरूस्तीसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:28 IST2021-03-19T04:28:35+5:302021-03-19T04:28:35+5:30

हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येकी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्रांच्या दुरूस्ती व इतर कामासाठी २ कोटी ५४ लाखांचा ...

Fund of Rs | आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरूस्तीसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

आरोग्य केंद्र, उपकेंद्र दुरूस्तीसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर

हिंगोली : जिल्ह्यातील प्रत्येकी पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व तीन उपकेंद्रांच्या दुरूस्ती व इतर कामासाठी २ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. याबाबतचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाने १८ मार्च रोजी काढले आहेत. या निधीमुळे आरोग्य सुविधा बळकटीकरणाला मदत होणार आहे.

जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंदांच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. काही आरोग्य केंद्रांमध्ये फर्निचर, निवास बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युतीकरण आदी कामे प्रलंबित आहेत. त्यामुळे आरोग्य कर्मचारी, रूग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही विविध कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच तीन आरोग्य उपकेंद्रांसाठी २ कोटी ५४ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार हयातनगर (ता. वसमत) ५४ लाख, कापडसिंगी (ता. सेनगाव) ३० लाख, पिंपळदरी (ता. औंढा) ४० लाख, साखरा (ता. सेनगाव) ४० लाख, पांगरा शिंदे (ता. वसमत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ६० लाख रूपयांचा निधी मिळाला आहे. तसेच जडगाव (ता. औंढा) १० लाख, आडोळ (ता. सेनगाव) १० लाख, सिंदगी (ता. कळमनुरी) येथील आरोग्य उपकेंद्राला १० लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून इमारत बांधकाम, निवासस्थान, फर्निचर, पाणीपुरवठा, संरक्षक भिंत बांधकाम यासह इतर कामे करण्यात येणार आहेत. दरम्यान, ही कामे करण्यासाठी प्रत्येक कामाची स्वतंत्र निविदा काढावी लागणार असून, मंजूर निधीतून ही कामे पूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी लागणार आहे.

Web Title: Fund of Rs