निवडणूक आयोग भाजपाच्या हातची कठपुतळी बाहुली बनली; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 14:08 IST2025-11-24T14:08:13+5:302025-11-24T14:08:34+5:30
भाजपा लवकरच सध्या सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांना (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट आणि शिंदेसेना) फोडल्याशिवाय राहणार नाही

निवडणूक आयोग भाजपाच्या हातची कठपुतळी बाहुली बनली; हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
वसमत : सध्याच्या सरकारमध्ये सध्या टोळीयुद्ध सुरू आहे, असे सांगत निवडणूक आयोग सरकारच्या हातची कठपुतळी बाहुली बनली आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वसमत येथे केला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते वसमत येथे महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी सपकाळ बोलत होते. ते म्हणाले, पक्षाची फोडाफोडी आणि उमेदवारांची पळवापळवी भ्रष्टाचार व अहंकारातून केली जात आहे. भाजपा लवकरच सध्या सत्तेत असलेल्या दोन्ही पक्षांना (राष्ट्रवादी काँग्रेस-अजित पवार गट आणि शिंदेसेना) फोडल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघातही त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या त्रिसूत्रीवर भर
यावेळी सपकाळ यांनी कार्यकर्त्यांना ‘विश्वास, विचार आणि विकास’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पुढे जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, ‘भाजपा दंडेलशाही आणि मुजोरीच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहे. भरपूर पैसा खर्च करत आहे. लोकशाही वाचवण्याचे काम संविधानवासीयांना करायचे आहे.’
‘बाप चोरणारी टोळी’ आणि ‘कठपुतळी आयोग’
भाजपावर टीका करताना सपकाळ यांनी ‘बाप चोरणारी टोळी भाजपने सांभाळली,’ असा उल्लेख करत याचा तीव्र धिक्कार व निषेध केला. निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना त्यांनी आयोग ‘भाजपच्या हातची कठपुतळी बनली आहे,’ असे स्पष्ट मत व्यक्त केले. तसेच, महाराष्ट्राच्या नेतृत्वावर टीका करताना त्यांनी ‘महाराष्ट्राचे निर्णय केंद्रीय गृहमंत्री घेतात, तेच सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत,’ असा टोला लगावत राज्य सरकारचा समाचार घेतला.
यावेळी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे, सिद्धार्थ हत्तीआंबिरे, अ. हाफीज अ. रहेमान, सुनील काळे, मरियाजोद्दीन कुरेशी आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.