Drought In Marathwada : दुष्काळ सांगताही येईना, सहनही होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 03:35 PM2018-11-17T15:35:25+5:302018-11-17T15:39:04+5:30

भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही.

Drought in Marathwada: Not being able to tell drought, be tolerant | Drought In Marathwada : दुष्काळ सांगताही येईना, सहनही होईना

Drought In Marathwada : दुष्काळ सांगताही येईना, सहनही होईना

googlenewsNext

- चंद्रकांत देवणे ( वसमत,जि. हिंगोली) 

कधी नव्हे, ते यावर्षी वसमत तालुक्याला दुष्काळाचे चटके बसले आहेत. तीन वर्षापासून धरण भरत नसल्याने सिंचनाला पाणी नसल्याने शेतकऱ्यांची उशाला असलेली शिदोरी संपलेली आहे. आता या वर्षी तर पाऊसही नाही व धरणातही पाणी नसल्याने पेरलेले तेही उगवले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आजवर पाणीदार तालुका सुपीक जमीन, सधन शेतकरी, सर्व आबादी आबाद असाच गोड गैरसमज तालुक्याबद्दल होता. शासन दरबारीही तीच नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दुरून डोंगर साजरा अशीच अवस्था आहे. शेतकऱ्यांची पुरती कोंडी झाली आहे. मोठेपणाचा शिक्का बसल्याने सांगताही येईना, अशीच अवस्था आहे. पेरले एवढेही उगवले नसल्याने मोठेपणाही करता येईना.

एवढी भीषण परिस्थिती असतानाही शासन दरबारी मात्र वसमत तालुक्याची दुष्काळी परिस्थिती म्हणून नोंद नाही. दुष्काळाने होरपळत असतानाही दुष्काळ नसल्याचे शासनाचे म्हणणे आहे. वसमत तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी तालुक्यातील सेलू या गावास ‘लोकमत’ने भेट दिली असता पाणीदार वसमत तालुक्यातील या गावाला हिवाळ्यातच पिण्याच पाणी मिळत नसल्याचे भयावह चित्र समोर आले. टँकर मागणी केली तरी पाणीदार तालुका असल्याने टँकर मिळत नाही. सधन शेतकरी असलेल्या या गावातील ३०० पेक्षा जास्त ग्रामस्थ दुष्काळ जाणवत असल्याने कामासाठी पुणे, नाशिक सारख्या भागात कामाच्या शोधार्थ रवाना झाले आहेत. म्हणून गावात भयाण शांतता दिसत आहे.

गाव सोडून जाणाराने गरीब शेतमजूरच नाहीत तर शेतकरीही आहेत. कापूस, हळद, सोयाबीन हे मुख्य पीक असलेल्या सेलू गावातील पिक परिस्थिती पाहिली तर अजून कसा दुष्काळ पाहिजे? असा प्रश्न समोर येतो. कापूस, सोयाबीन, शंभरटक्के गेले आहे. परिसरातील २५० एकर हळदीवर वरवंटा फिरला आहे. गावात तर पाणी नाहीच परिसरातील दहा कि.मी. परिघातही शेतात मोटर चालत नाही. त्यामुळे जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ३ बॅग कापूस पेरल्यानंतर अडीच क्विंटलचा उतारा आला आहे. त्यामुळे खर्च किती टक्के वसूला झाला याचेच गणित करण्याची वेळ आलेली आहे. सोयाबीन एकरी एक क्विंटलचा उतारा तर हळद कपरून गेल्याने सेलू भागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.भयावह दुष्काळ भोगत असलेल्या सेलू गावातील दृष्काळी परिस्थिती पाहण्यासाठीही कोणीही नेता लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, शासकीय अधिकारी फिरकत नसल्याने दखलही कोणी घेत नसल्याची खंत आहे.

यावर्षी तर शेतात पेरणी करण्याचेच काम राहिले नाही. त्यामुळे काय करावे, हाच प्रश्न आहे. सर्वाधीक चिंता जनावरांची आहे. जनावरांना सध्याच चारा नसल्याने भकाळ्या दिसत आहेत. आता उन्हाळ्यात काय होईल, ही चिंता आहे. सेलू गावात आतापासूनच पिण्याचे पाणी नाही, शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नाही, मजूरांच्या हाताला काम नाही, त्यामुळे आगामी काळ प्रचंड संकटाचा राहणार असल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत.

बळीराजा काय म्हणतो ?

- गावात पिण्यासाठी पाणी आजच नाही. शेतात काम नाही. शेतकरीच बेजार आहे तर शेतमजूराला कुठून काम मिळणार? वाढलेल्या वयामुळे गाव सोडूनही बाहेर जाता येत नाही. त्यामुळे येणारे वर्ष कठीण आहे. -प्रल्हाद नागोराव वाव्हळे (शेतमजूर)

- ३ बॅग कापूस पेरला होता दोन क्विंटलच निघाला, सोयाबीन किती झाले हे सांगण्याचीही लाज वाटत आहे. आता पुढच्यावर्षी तर पेरणी करण्याचीच सोय नाही. पेरणीवर केलेला खर्चही ५० टक्के निघाला नाही. त्यामुळे पुरते कंबरडे मोडले आहे. तरीही शासन सर्कलला दुष्काळी जाहीर करत नाही. - तुकाराम दत्तराव बाभळे (शेतकरी)

- जनावरांना चारा आजही उपलब्ध नाही पाणी मिळणे अवघड झाले आहे. काळ्या रानात जनावरे दिवसभर उभे करून रात्री पुन्हा गोठ्यात बांधावी लागत आहेत. मानसाचे कसेही धकेल. जनावरांचे काय करावे? - रंगनाथ सखाराम वसमतकर (पशुपालक) 
 

- सेलू गाव मराठवाड्यात सर्वाधिक दुष्काळी गाव आहे. पिण्याच्या पाण्याचा सोर्स नाही. दरवर्षी जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरते. यावर्षी तर सप्टेंबर पासूनच विहिरी बोअर कोरडे झाले आहेत. टँकरची मागणी केली. मात्र प्रशासन जुन्या नोंदी दाखवून टँकर देत नाही. स्वत:च्या टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठीही परिसरात पाणी नाही. शेतीचे वाळवंट झाले आहे. ४०० पेक्षा जास्त ग्रामस्थ गाव सोडून गले आहेत. गावाला मदत करण्यासाठी आजपर्यंत आमदार, खासदारही गावाकडे फिरकले नाही. त्यामुळे संकटाशी ग्रामस्थ देवाच्या भरवशावर लढत आहेत.  - चंद्रकांत देशमुख (सरपंच) 

काही आकडेवारी

भौगोलीक क्षेत्रफळ- ९० हजार हेक्टर
लागवड योग्य क्षेत्र- ७५ हजार ५०० हेक्टर
पावसाची सरासरी- ९९९ मि.मी.
यावर्षीचा पाऊस  ६८० मि.मी. ६७.३० टक्के
खरीपाची लागवड
कापूस- १७.५०० हेक्टर
सोयाबीन- ३२.४०० हेक्टर
हळद- १६.६००
तुर- ४ हजार हेक्टर
मुग- उडीद- २५०० हेक्टर

Web Title: Drought in Marathwada: Not being able to tell drought, be tolerant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.