इसापूर धरणातून विसर्ग; पैनगंगावरील पूल पाण्याखाली गेल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2022 15:47 IST2022-08-09T15:42:45+5:302022-08-09T15:47:58+5:30
इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात ३९१०१ क्युसेक्स इतका विसर्ग सूरू आहे.

इसापूर धरणातून विसर्ग; पैनगंगावरील पूल पाण्याखाली गेल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला
कळमनुरी (हिंगोली ): आवक वाढल्याने इसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. अचानक पाणी पातळी वाढल्याने शिऊर पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे शेंबाळपिंपरी ते कळमनुरी मार्ग आज सकाळीपासून ६.३० वाजेपासून बंद झालेला आहे. हा मार्ग बंद झाल्याने विदर्भ-मराठवाडा संपर्क तुटला आहे.
मागील दोन ते तीन दिवसांपासून इसापूर धरण परिसर व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणात आवक वाढली आहे. परिसरातील पाऊस आणि वाढलेली आवक यामुळे इसापूर धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता धरणाची २, १४, ८, ७, ९, ६, १०, ५, ११, ४, १२ क्रमांकाचे दरवाजे १ मीटरने दरवाजा क्रमांक ३ व १३ हे दोन दरवाजे ५० से.मी.ने उघडण्यात आले आहेत. १३ दरवाजातून पैनगंगा नदीपात्रात ३९१०१ क्युसेक्स इतका विसर्ग सूरू आहे. धरणामध्ये येणारी पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढवणे किंवा कमी करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. पैनगंगा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
पैनगंगावरील पूल पाण्याखाली, विदर्भ- मराठवाडा संपर्क तुटला
पैनगंगा नदी पात्रात धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे विदर्भ मराठवाड्याला जोडणारा शिऊरच्या पुलावरून तीन ते चार फुटापर्यंत पाणी जात आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहेत. हा पूल पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. आज सकाळी साडेसहा वाजेपासून विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटलेला आहे. विदर्भाकडे जाणाऱ्या नागपूर, चंद्रपूर, पुसद आदी बसेस येथील आगारातच लावलेल्या आहेत. पुसदहून कळमनुरीकडे येणाऱ्या बसेस पुसद येथेच थांबविण्यात आलेल्या आहेत. कळमनुरीहून पुसदकडे जाणाऱ्या सर्व बसेस व वाहतूक बंद आहे.