नियतीला मान्य नव्हते त्याने दहावीची परीक्षा द्यावी; मजुर मुलाचा कुकरच्या स्फोटात मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 18:19 IST2022-03-22T18:19:18+5:302022-03-22T18:19:51+5:30
वडिलांच्या मृत्यूमुळे दहावीतच कुटुंबप्रमुख झालेल्या मुलगा कुकरच्या स्फोटात गंभीर जखमी झाला, यातच त्याची ‘एकाकी झूंज’ अपुरी ठरली

नियतीला मान्य नव्हते त्याने दहावीची परीक्षा द्यावी; मजुर मुलाचा कुकरच्या स्फोटात मृत्यू
- शिवाजी राऊत
कहाकर ( बु ) ( हिंगोली ): हलाखीची परिस्थितीवर बदलण्यासाठी शिक्षण आणि मजुरी करणाऱ्या एका मुलाची एकाकी झुंज अपयशी पडली आहे. दहावीचा मराठीचा पेपर झाल्यानंतर १९ मार्चला रोजी मजुरीवर आलेल्या नागेश मल्हारी कांबळे हा हळद शिजविण्यासाठीच्या कुकरच्या स्फोटात गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.
सेनगाव तालुक्यातील कहाकर बु. येथील युवक नागेश मल्हारी कांबळे ( १७ ) हा हराळ ता. रिसाेड येथील शिवाजी विद्यालयात १० वी वर्गात शिक्षण हाेता. वडील नसलेल्या नागेशवर कुटुंबाची सर्व जबाबदारी होती. यामुळे मजुरी करून शिक्षण पूर्ण करणे असे ददुहेरी काम तो करत असे. १५ मार्चला दहावीचा मराठीचा पेपर देऊन तो घर चालविण्यासाठी पुन्हा मजुरीवर गेला. १९ मार्च राेजी नागेश हळद शिजवण्यासाठी रात्रपाळीच्या मजूरीसाठी देवराव प्रभाकर पाेपळघट यांच्या शेतात गेला. हळद शिजवण्याचे काम सुरू असताना अचानक कुकरचा माेठा स्फाेट झाला.
या स्फाेटात अजय अमृता खंदारे, विशाल आत्माराम वैरागढ, संताेष अमृता खंदारे, देवराव प्रभाकर पाेपळघट, संदीप श्रीराम पाेपळघट व नागेश मल्हारी कांबळे हे जखमी झाले. नागेश यात ९० टक्के भाजला होता. त्याच्यावर सुरुवातीला वाशिम आणि नंतर अकाेला येथे उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान आज सकाळी ६ वाजता मृत्यू झाला. त्याच्या पश्चात अपंग आई आणि पाच बहिणी आहेत. मजुरी करत शिक्षण घेत हलाखीची परिस्थिती बदलायची त्याची ‘एकाकी झूंज’ आज संपल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.