'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 04:46 PM2019-01-16T16:46:52+5:302019-01-16T17:19:06+5:30

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत.

'Cotton has dried up', farmers fainted after Aditya Thackeray's adverse reaction on cotton | 'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

'कापूस सुकून गेलाय', वाळलेल्या कापसावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया ऐकून शेतकरी अवाक्

Next
ठळक मुद्दे आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त गावांच्या दौऱ्यावर  येणार होते १ वाजता, पोहोचले ४ वाजताशेतकरी बसले ताटकळत

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त दौऱ्यावर आले आहेत. ते गावात येणार म्हणून सकाळपासून शेतकरी वाट बघत बसले. पण, १ वाजता येणारे आदित्य ठाकरे प्रत्यक्षात पोहोचले ४ वाजता. त्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केलेल्या संवादात आदित्य ठाकरे यांनी वाळून गेलेल्या कापसाला सुकून गेलाय असे म्हणताच, उपस्थित शेतकरी अवाक् झाले आणि हसलेही ! 

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवसाच्या दुष्काळी दौऱ्यावर मराठवाड्यात आले आहेत. मंगळवारी दुपारी १ वाजता ते कळमनुरी तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देणार होते. परंतु त्यांना कळमनुरीत येण्यासाठी चार वाजले. दरम्यान, सकाळपासून शेतकरी ताटकळत बसले होते. कळमनुरी तालुक्यातील साळवा या गावाला आदित्य यांनी भेट दिली. साळव्यातील श्रीपतराव बाबाराव कदम, विठ्ठल किशनराव माखणे, सुभाष सखाराम करंडे, तुकाराम केरबा करंडे, श्रीधर भाऊराव टोपरे या शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात पशुखाद्याचे वाटप केले. त्यानंतर कांडली गावातील एकनाथ भारती यांच्या शेतातील कापसाच्या वाळलेल्या शेतीची पाहणी केली. तसेच प्रशासनाकडून काही मदत केली का? अशी चौकशीही केली. त्यानंतर हरिभाऊ सोनटक्के या शेतकऱ्याला पशुखाद्याचे वाटप केले. 

कांडली येथे शेतकऱ्यांशी संवाद साधताना आदित्य म्हणाले, आत्महत्या करू नका. खचून जाऊ नका. शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कुठलीही अडचण आल्यास शिवसैनिकाला हाक मारा. तुम्हाला मदत मिळेल, असा धीर त्यांनी दिला. पण, वाळलेल्या कापसाच्या शेतीला आदित्य यांनी ‘कापूस सुकून गेला’ असे म्हणताच गोंधळून गेलेल्या शेतकऱ्यांमध्ये खसखस पिकली. यानंतर तोंडापूर येथेही त्यांच्या हस्ते पशुखाद्याचे वाटप करण्यात आले. दौऱ्यात त्यांच्यासमवेत आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, आ. हेमंत पाटील, आ. विप्लव बाजोरिया, जिल्हाप्रमुख संतोष बांगर, जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे,  जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, युवा जिल्हाप्रमुख दिलीप घुगे, भिसेंसह शिवसैनिक उपस्थित होते. 

शेतकऱ्यांची निराशा
कांडली व साळवा गावात आदित्य ठाकरे येणार असल्याने शेतकऱ्यांना १० वाजताच बोलविण्यात आले होते. पण, आदित्य ४ वाजता आले. त्यामुळे शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. तीनही ठिकाणी अवघ्या दहा-दहा मिनिटांत कार्यक्रम उरकून ते रवाना झाले. त्यांच्या या मॅरेथॉन दौऱ्यात नाममात्र संवाद साधून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

Web Title: 'Cotton has dried up', farmers fainted after Aditya Thackeray's adverse reaction on cotton

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.