काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:05 IST2025-12-17T12:05:15+5:302025-12-17T12:05:45+5:30
गांधी कुटुंबाच्या जवळचे दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नीच्या निर्णयाने राजकीय तर्कवितर्कांना उधाण.

काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
हिंगोली : येथील काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर असून, गुरुवारी १८ डिसेंबर रोजी मुंबई येथे त्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. हा काँग्रेसला मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे.
आ.प्रज्ञाताई सातव ह्या दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या अत्यंत जवळचे घराणे म्हणून सातव घराण्याची ओळख आहे. विधान परिषदेच्या सदस्य असलेल्या डॉ.प्रज्ञाताई सातव ह्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार आहेत. विधान परिषदेच्या मागील निवडणुकीत काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली. त्यात विजयी झाल्या होत्या. मात्र अलीकडच्या काळात काँग्रेसमध्ये त्या नाराज असल्याचे दिसत होते. दरम्यान, आ.प्रज्ञाताई सातव यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे.
कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
या संदर्भात आमदार सातव यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळाली नाही. मात्र त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात आहे. गुरुवारी मुंबई येथे त्यांचा भाजप प्रवेश होईल. या प्रवेशासाठी बुधवारीच कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत आहेत.
कॉँग्रेसची सावध प्रतिक्रिया
दरम्यान, प्रज्ञा सातव यांच्या संभाव्य भाजप प्रवेशावर काँग्रेसने अधिकृत भूमिका मांडली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले की, “काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना आमदारकी दिली आहे. त्या असा कोणताही टोकाचा निर्णय घेतील असे वाटत नाही. ही बातमी तथ्यहीन आहे. पक्ष त्यांच्या संपर्कात आहे आणि आम्ही त्यांच्याशी संवाद ठेवणार आहोत.”
२०३० पर्यंत आहे आमदारकीचा कार्यकाळ
स्वर्गीय राजीव सातव यांच्या निधनानंतर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली होती. त्या सध्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष असून विधान परिषदेच्या आमदार आहेत. २०२१ साली शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर त्या बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यानंतर २०२४ मधील निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची निवड झाली असून २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत गटबाजी, दुर्लक्ष आणि असंतोषामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.