'तोंड काळं', 'क्लिप' ते '५० कोटीं'; भाजप-शिंदेसेनेच्या आमदारांनी एकमेकांची 'लक्तरं' काढली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:38 IST2025-11-27T17:36:59+5:302025-11-27T17:38:09+5:30

हिंगोलीत महायुतीतील 'कलह' पराकोटीला; दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक स्तरावर उतरून गंभीर आणि खालच्या पातळीचे आरोप केले आहेत

Claim of 'tond kaal' to '50 crores'; BJP-Shinde Sena MLAs Bangar and Matkule 'taunted' each other in Hingoli | 'तोंड काळं', 'क्लिप' ते '५० कोटीं'; भाजप-शिंदेसेनेच्या आमदारांनी एकमेकांची 'लक्तरं' काढली!

'तोंड काळं', 'क्लिप' ते '५० कोटीं'; भाजप-शिंदेसेनेच्या आमदारांनी एकमेकांची 'लक्तरं' काढली!

हिंगोली: राज्याच्या सत्तेत सोबत असलेल्या महायुतीतील मित्रपक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत संयमाची मर्यादा ओलांडली आहे. हिंगोली नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना (शिंदे गट) आमदार संतोष बांगर आणि भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्यातील वाक् युद्ध पराकोटीला गेले असून, दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक स्तरावर उतरून गंभीर आणि खालच्या पातळीचे आरोप केले आहेत. या चिखलफेकीमुळे महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.

'पन्नास खोके' ते 'हद्दपार' आणि 'खून' प्रकरणाचे आरोप
या वादंगाची सुरुवात आमदार बांगर यांनी भाजप आमदारावर 'दबावतंत्र' वापरल्याचा आरोप करत केली.
"पहाटे सहा वाजता सर्वजण झोपलेले असताना माझ्या घरासमोर शंभर पोलिसांचा ताफा उभा राहिला. कपाटं, कपडे, फ्रिजमधील साहित्य, सगळं सामान बाहेर काढलं. माझ्यासारख्या आमदारावर अशी वेळ येत असेल, तर सर्वसामान्यांचे काय?" असा खळबळजनक दावा करत बांगर यांनी मुटकुळे यांचे नाव न घेता टीका केली.

या आरोपाला मुटकुळे यांनी तातडीने जशास तसे प्रत्युत्तर दिले. त्यांनी बांगर यांची जुनी प्रकरणे उकरून काढली. "आमदार बांगर यांच्यावर २०१२-१३ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल होता आणि हिंगोली जिल्हा न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावली होती. याच कारणामुळे त्यांच्या घराची झडती झाली असेल," असा टोला मुटकुळे यांनी लगावला.

'तोंड काळं' ते '५० कोटीं'चा धक्कादायक दावा
मुटकुळे यांच्या टीकेने संतापलेल्या बांगर यांनी तातडीने मुटकुळे यांच्यावर वैयक्तिक हल्ला चढवला. "तानाजीराव तुमच्यासारखं तोंड काळं करायचं काम संतोष बांगरने केलं नाही. या आमदारापासून माझ्या मायबाप जनतेने, माता-भगिनींनी सावध राहावं, यांची नजर वाईट आहे," असे म्हणत बांगर यांनी मुटकुळेंची कोंडी केली. एवढेच नाही तर, "माझ्याकडे तुमची एक क्लिप आहे, ती बाहेर काढली तर तुम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्याय नाही," अशी धमकी वजा दमही बांगर यांनी दिला.

या सर्व वाक् युद्धादरम्यान, मुटकुळे यांनी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अत्यंत धक्कादायक दावा केला. "पन्नास खोके ही घटना सत्य आहे. शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदेंकडून ५० कोटी रुपये घेतले आहेत," असा गंभीर आरोप मुटकुळे यांनी केला. हिंगोली जिल्ह्यात मटका, जुगार, अवैध धंदे चालवून तरुणांची पिढी बरबाद करणारे आमदार संतोष बांगर म्हणजे हिंगोलीला लागलेला कलंक असल्याची विखारी टीकाही मुटकुळे यांनी केली.

राज्यात सत्ता टिकवण्यासाठी युती आवश्यक असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील या टोकाच्या वाक् युद्धामुळे युतीतील फूट अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Web Title : भाजपा-शिंदे सेना विधायकों में जुबानी जंग, स्थानीय चुनाव में आरोप-प्रत्यारोप।

Web Summary : हिंगोली के स्थानीय चुनावों में महायुति में दरार उजागर, शिवसेना के बांगर और भाजपा के मुटकले ने भ्रष्टाचार और हत्या के आरोपों सहित व्यक्तिगत हमले किए। कलह से गठबंधन की स्थिरता खतरे में।

Web Title : BJP-Shinde Sena MLAs trade barbs, accusations fly amid local election feud.

Web Summary : Hingoli's local elections expose MahaYuti's rift as Sena's Bangar and BJP's Mutkule trade personal attacks, including corruption and murder allegations. The feud threatens coalition stability.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.