छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 16:13 IST2023-11-09T16:13:08+5:302023-11-09T16:13:18+5:30
सातारा परिसरात आठ वर्षांनंतर ७,५५० अन् शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावणार

छत्रपती संभाजीनगर १२ हजार पथदिव्यांनी उजाळणार; पुढील चार महिन्यांत होणार काम
छत्रपती संभाजीनगर : सातारा-देवळाईचे मनपाकडे हस्तांतरणास ८ वर्षे झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिका या भागात पथदिवे लावणार आहे. या भागात ७,५०० तर उर्वरित शहरात ४,५०० नवीन पथदिवे लावण्याचे आदेश प्रशासक जी.श्रीकांत यांनी विद्युत विभागाला दिले. ३१ मार्च, २०२४ पर्यंत हे काम पूर्ण झाले पाहिजे, अशी डेडलाइनही त्यांनी दिली.
स्मार्ट सिटी कार्यालयात प्रशासकांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत पथदिव्यांचा मुद्दा चर्चेला आला. नवीन वसाहतींमध्ये पथदिवे लावावेत, अशी सातत्याने मागणी होत असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. प्रशासक स्वत: जेव्हा विविध वसाहतींमध्ये पाहणीसाठी जातात, तेव्हाही नागरिक पथदिव्यांचा मुद्दा उपस्थित करतात. ज्या भागात पथदिवे लावलेले नाहीत, अशा भागात पथदिवे लावावेत. सातारा-देवळाई येथे नवीन पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. ड्रेनेजलाइनच्या कामाला सुरुवात झाली. बहुतांश रस्त्यांवर पथदिवे नाहीत. त्यामुळे नागरिकांना रात्री अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे लावण्यासाठी विद्युत विभागाने योग्य नियोजन करावे. सातारा-देवळाई भागात ७,५०० तर नो नेटवर्क भागातही ४,५०० पथदिवे लावावेत. शहर प्रकाशमय करण्याच्या दृष्टीने १२ हजार पथदिवे लावण्यासाठी प्रशासकांनी मान्यता दिली.
६० हजार पथदिवे आतापर्यंत
शहरात ४० हजार पथदिवे असावेत,असे गृहीत धरून दिल्लीच्या इलेक्ट्रॉन कंपनीला एलईडी दिवे लावण्याचे काम दिले. दहा वर्षांसाठी हे काम दिले. कंपनीने ४० हजारांचा टप्पा पूर्ण केल्यावर अनेक भागांत जुनेच चायनामेड दिवे होते. त्यामुळे २० हजार आणखी दिवे लावले. कंपनीने यासाठी अतिरिक्त पैसे घेतले नाहीत. एलईडी पथदिव्यांमुळे दरमहा सव्वाकोटी रुपयांचे विद्युत बिल कमी येत आहे.