घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 20:06 IST2025-08-07T20:04:57+5:302025-08-07T20:06:44+5:30
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही

घरी कोणी नसल्याची संधी साधत वसमतमध्ये भरदिवसा घरफोडी; लाखोंचे दागिने, रोकड लंपास
- इस्माईल जहागीरदार
वसमत : शहरातील श्रीनगर भागात आज दुपारी १२. ३० ते ३ वाजेच्या सुमारास भरदिवसा घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी शर्मा यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत २ तोळे सोन्याचे दागिने व नगदी दहा हजार रुपये असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
आधारवरील माहिती अपडेट करण्यासाठी व स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेण्यासाठी शहरातील श्रीनगर भागात राहणाऱ्या शर्मा या महिला आज दुपारी १२: ३० वाजेदरम्यान घराला कुलूप लावून बाहेर पडल्या. हीच संधी साधून चोरट्यांनी घराचे कुलूूप तोडत आत प्रवेश करत कपाटातील २ तोळे सोन्याचे दागिने व नगदी १० हजार रुपये लंपास केले. दरम्यान, शर्मा घरी आल्यानंतर त्यांना घरफोडी झाल्याचे लक्षात आले. माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस निरीक्षक सुधीर वाघ, जमादार शेख नय्यर, इम्रान कादरी, अजय पंडित, गजानन भोपे यांच्यासह इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
ठसे तज्ज्ञांना केले पाचारण...
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ठसेतज्ञे व श्वान पथकाला पाचारण केले. परंतु श्वान पथकाला चोरट्यांचा माग काही सापडला नाही, असे सांगण्यात आले. या प्रकरणी पोलिस चोरट्यांचा शोध घेऊ लागले आहे.
दोन महिन्यांत ही दुसरी घटना...
दोन महिन्यांपूर्वी अशीच भर दिवसा चोरीची घटना घडली. यानंतर पुन्हा ७ ऑगस्ट रोजी भर दिवसाच चोरीची घटना घडली आहे. पोलिस रात्री गस्त घालू लागले आहेत. परंतु चोरटे हे दिवसा चोरी करुन मोकळे होत आहेत. चोरीच्या घटना दिवसा होऊ लागल्यामुळे पोलिसांनी दिवसाही शहरात गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.