'पत्नीला नांदायला पाठवा' तगाद्याने वाढला वाद; संतापात सासरा-मेहुण्याने जावयाचा केला खून!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:06 IST2025-11-21T15:02:57+5:302025-11-21T15:06:57+5:30
या घटनेनंतर सासरा आणि मेहुणा या दोन्ही फरार आरोपींना पोलिसांनी दोन तासांत अटक केली

'पत्नीला नांदायला पाठवा' तगाद्याने वाढला वाद; संतापात सासरा-मेहुण्याने जावयाचा केला खून!
हिंगोली : पत्नीला नांदण्यास का पाठवित नाही, असे जावई सतत म्हणत असल्याने त्याविषयी विचारणा करण्यासाठी गेलेल्या सासरा आणि मेहुण्याने जावयाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना तालुक्यातील भटसावंगी येथे १९ नोव्हेंबर रोजी घडली आहे. हरिदास सीताराम चवरे (३३, रा. भटसावंगी, ता. जि. हिंगोली) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या जावयाचे नाव आहे.
या घटनेनंतर हरिदास यांचे भाऊ दत्ता सीताराम चवरे यांनी बुधवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून सविस्तर तक्रार दिली आहे. त्यावरून दोन जणांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिदास सीताराम चवरे हे त्यांची पत्नी वर्षा हिला नांदायला का पाठवत नाहीस, अशी विचारणा सासरच्या मंडळींकडे नेहमी करीत असत. त्यामुळे या संदर्भात बोलण्यासाठी आरोपी सासरा साहेबराव भिवाजी कपाटे आणि मेहुणा गोलू उर्फ शत्रुघ्न साहेबराव कपाटे (दोघे रा. भटसावंगी) हे १९ नोव्हेंबर रोजी दुपारी हरिदास यांच्या घरी आले होते.
या ठिकाणी दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून भांडण वाढत गेले. याच भांडणातून आरोपींनी दगडाने मारहाण करून हरिदास सीताराम चवरे यांचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीवरून आरोपी साहेबराव कपाटे व गोलू उर्फ शत्रुघ्न कपाटे या दोघांविरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक विकास आडे अधिक तपास करत आहेत.
दोन्ही आरोपींना अटक
या घटनेनंतर सासरा आणि मेहुणा हे दोघेही फरार झाले होते. पोलिस उपनिरीक्षक मदन गव्हाणे, कैलास गुंजकर, नामदेव हाके, सहायक पोलिस निरीक्षक विकास आडे आदींच्या पथकाने आरोपींचा शोध घेतला. आरोपी यवतमाळ जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हा नोंद झाल्यानंतर दोन तासांत दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.