निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 17:51 IST2026-01-29T17:50:14+5:302026-01-29T17:51:17+5:30

Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यतत्परतेच्या अनुभवाची आठवण आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितली.

Ajit Pawar Death: Didn't get funds? Ajitdada, eager to work, called the collector while walking. | निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्...

निधी मिळाला नाही? कार्यतत्पर अजितदादांनी चालत चालतच कलेक्टरांना फोन लावला अन्...

हिंगोली : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधी कलेक्टर साहेब वितरित करीत नाहीत, असे अजित दादांना सांगताच त्यांनी विधानभवनासमोरून चालत चालतच जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला. त्यांच्या एका फोनने हा निधी लगेच कामांसाठी वर्ग झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या कार्यतत्परतेच्या अनुभवाची आठवण आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितली.

अजित दादा हे धडाडीचे, निर्णयक्षम नेते होते. एक कार्यतत्पर नेता म्हणून त्यांची ओळख होती, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राची अपरिमित हानी झाली. कायम आठवणीत राहणारा हा नेता होता. कोणतेही काम ते जीव लावून करीत. विकासकामांसाठी त्यांनी कधीही आखडता हात घेतला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्याची मोठी हानी झाली, अशी भावना आ. तान्हाजी मुटकुळे यांनी व्यक्त केली.

स्पष्टवक्ते अजीत दादा कायम स्मरणात : आ. संतोष बांगर
जिल्ह्यातील विकास कामांच्या अनुषंगाने अनेक वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी भेटणे झाले. काम होत असेल तर हो म्हणणे आणि नसेल तर नाही, असा त्यांचा स्पष्टवक्तेपणा होता. विकासासाठी ते कायम आग्रही असायचे. कोणताही भेद न करता त्यांनी विकासाचा दृष्टिकोन कायम समोर ठेवला. अजीत पवार यांच्या निधनाने राज्याचा धडाडीचा नेता हरपला आहे. हे दुःख कधीही भरून न निघणारे आहे, अशा भावना आमदार संतोष बांगर यांनी व्यक्त केल्या.

कामाचा प्रचंड उरक असणारा नेता महाराष्ट्राने गमावला
वसमत : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्र पोरका झाला असून राजकारणातील एक अत्यंत धाडसी आणि धडाडीचे नेतृत्व आज हरपले आहे, अशा शब्दांत माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रद्धांजली अर्पण करताना दांडेगावकर म्हणाले, अजित पवार हे एक असे नेतृत्व होते ज्यांच्याकडे कामाचा प्रचंड उरक होता. राजकीय स्थित्यंतरे झाली, पक्ष बदलले, तरीही त्यांच्या कामाच्या झपाट्यात कधीही फरक पडला नाही. सत्तेत असताना त्यांनी नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. वसमत विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी अजित पवार यांनी नेहमीच मदतीचा हात दिला. दांडेगावकर यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले की, वसमतच्या विविध विकासकामांसाठी त्यांनी कधीही निधी कमी पडू दिला नाही. मंत्रिमंडळात त्यांच्यासोबत काम करताना त्यांचा स्पष्टवक्तेपणा आणि निर्णयक्षमता जवळून अनुभवता आली.

कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारा नेता हरपला
हिंगोली : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन सर्वांसाठीच धक्कादायक आहे. हिंगोलीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. त्यांच्या जाण्याने कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना अॅड. स्वप्निल गुंडेवार यांनी व्यक्त केली. २०१३ साली माजी खासदार विलासराव गुंडेवार नांदेड येथील दवाखान्यात भरती होते. त्यावेळी नांदेड दौऱ्यावर आलेले 'दादा' यांना गुंडेवार हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजताच त्यांनी प्रशासन, कार्यकर्त्यांना कुठलीही कल्पना न देता सकाळीच हॉस्पिटल गाठले. रुग्णालयात येऊन त्यांनी माजी खासदार विलासराव गुंडेवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करून धीर दिला. डॉक्टरांनाही लक्ष देण्याच्या सूचना केल्या. आपल्या शिस्तप्रिय कार्यपद्धतीने आणि विकासकामांच्या धडाक्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या 'दादां'च्या जाण्याने हिंगोली शहराने एक खंबीर पाठीराखा गमावला आहे, अशा शब्दांत गुंडेवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Web Title: Ajit Pawar Death: Didn't get funds? Ajitdada, eager to work, called the collector while walking.