विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 16:02 IST2024-10-09T16:01:58+5:302024-10-09T16:02:34+5:30
सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला

विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या बसची भिंतीला धडक; पालकांचा जीव टांगणीला
हिंगोली : विद्यार्थिनींना शाळेकडे घेऊन निघालेल्या मानव विकास मिशनच्या बसची घराच्या भिंतीला धडक बसल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे घडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख यांनी दिली. दरम्यान, या घटनेत भिंतीचे मात्र काही प्रमाणात नुकसान झाले.
हिंगोली आगारांतर्गत (एमएच ०६-एस ८६५१) मानव विकास मिशनची बस हिंगोली येथून सकाळी ७ वाजेच्या सुमारास सेनगाव तालुक्यातील दाताडा खु., दाताडा बु., कोळसा येथील विद्यार्थिनींना शाळेत पोहोचविण्यासाठी निघाली होती. ही बस सकाळी ८ वाजेच्या सुमारास वटकळी येथे पोहोचली. या ठिकाणी चालक वाघमारे हे बस वळवत होते. त्यावेळी रस्त्यालगतच्या भिंतीला धडक बसली.
यात प्रल्हाद मुंढे यांच्या घराच्या भिंतीचे नुकसान झाले. तसेच शेजारीच असलेल्या गजानन मुंडे यांच्या घराच्या ओट्याचा भागही पडला. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. यात एसटी बसचा पत्रा वाकला. घटनेची माहिती कळताच हिंगोली आगाराचे वाहतूक निरीक्षक एफ. एम. शेख यांच्यासह मजहर पठाण, विश्वनाथ सांगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर विद्यार्थिनींना शाळेत पोहोचविण्यात आले.