८० विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि दुबईत अडकले, हिंगोलीतील विद्यार्थिनीचाही समावेश; परतीचा मार्ग झाला मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 12:32 IST2026-03-03T12:29:41+5:302026-03-03T12:32:09+5:30
पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटचे ८० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली शहरातील खुशी महावीर बडेरा या विद्यार्थिनीचाही समावेश आहे.

८० विद्यार्थी सहलीसाठी गेले आणि दुबईत अडकले, हिंगोलीतील विद्यार्थिनीचाही समावेश; परतीचा मार्ग झाला मोकळा
हिंगोली : युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमध्ये अडकलेल्या ८० विद्यार्थ्यांचा भारतामध्ये परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाविद्यालय प्रशासन आणि राज्य शासनाने केलेल्या प्रयत्नांमुळे दुबईत अडकलेले हे विद्यार्थी आज, ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता विमानाने भारतात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
पुणे येथील इंदिरा इन्स्टिट्यूटचे ८० विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दुबई येथे गेले होते. या विद्यार्थ्यांमध्ये हिंगोली शहरातील खुशी महावीर बडेरा या विद्यार्थिनीचाही समावेश होता. इंदिरा इन्स्टिट्यूटने २३ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांची ही सहल दुबईला नेली होती. दुबई येथील महाविद्यालये आणि विविध व्यावसायिक संस्थांना भेटी देऊन हे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासाचा अनुभव घेत होते.
१ मार्च रोजी विद्यार्थ्यांच्या परतीचे नियोजन होते; मात्र युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे दुबई येथील विमानसेवा विस्कळीत झाली आणि अनेक विमाने रद्द करण्यात आली. त्यामुळे हे विद्यार्थी दुबईत अडकून पडले.
सर्व विद्यार्थी दुबईतील एका हॉटेलमध्ये सुरक्षित असल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली होती. दरम्यान, या विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यासाठी महाविद्यालय प्रशासन आणि राज्य शासनाने विशेष प्रयत्न केले.
'स्टार एअरलाइन्स'च्या विमानाने हे विद्यार्थी ३ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता भारताकडे निघणार आहेत. दुबई येथील फुर्जा विमानतळावरून हे विद्यार्थी स्टार एअरलाइन्सच्या विमानाने भारताकडे परतीचा प्रवास करणार असल्याची माहिती मिळाली आहे.