१८२२ बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:40 IST2018-05-25T00:40:28+5:302018-05-25T00:40:28+5:30
महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकडे रेटा लावल्याचेही चित्र आहे. काही गावांत तर यासाठी दलाल सक्रिय असून याची तपासणी होणे गरजेचे आहे.

१८२२ बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य इमारत व इतर बांधकाम कामगारांना अवजारे खरेदीसाठी शासनाकडून ५ हजार रुपये अर्थसहाय्य केले जात आहे. जून २०१७ ते मे २०१८ अखेरपर्यंत नोंदणीकृत १८२२ कामगारांना याचा लाभ मिळाला आहे. मात्र अनेकांनी बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी ग्रामसेवकांकडे रेटा लावल्याचेही चित्र आहे. काही गावांत तर यासाठी दलाल सक्रिय असून याची तपासणी होणे गरजेचे आहे.
जिल्हा कामगार कार्यालय हिंगोली येथे एप्रिल २०१८ अखेर ४ हजार ७७८ नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो. परंतु अनेक कामगारांना योजनांची माहिती नसते. शिवाय त्यांना नोंदणीचे महत्त्वही माहिती नसल्यामुळे जिल्हाभरातील कामगार शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहतात. त्यामुळे बांधकाम किंवा इतर कामगारांनी कामगार कार्यालयात नोंदणी करून घेण्याचे आवाहन प्रभारी कामगार अधिकारी टी. ई. कराड यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यात नोंदणीकृत ४७७८ बांधकाम कामगार आहेत. कार्यालयातील आकडेवारीवरून मोजकेच नोंदणीकृत कामगार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय खासगी कंत्राटदार कामगारांना ९० दिवसांचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे कामगार कार्यालयात नोंदणीसाठी कामगारांना अडचणी येतात. शासनाकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अवजारे खरेदीसाठी पाच हजारांचे अर्थसहाय्य केले जात आहे. त्यामुळे नोंदणीकृत बांधकाम कामगार ९० दिवस काम केल्याबाबतच्या प्रमाणपत्रासाठी धावपळ करीत आहेत. रोजगार हमी योजनेअंतर्गत घरकुलांचे ९० दिवसांचे काम केल्याचे प्रमाणपत्रांसाठी ग्रामसेवकांकडे बांधकाम कामगारांची गर्दी होत आहे. परंतु त्यांच्या कामाचे दिवस कमी भरत असल्याने त्यांची धावपळ होत आहे.
हिंगोली येथील जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात ४ हजार ७७८ बांधकाम कामगारांच्या नोंदी आहेत. कामगारांकडून आवश्यक कागदोपत्रांची पूर्तता करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी होत आहे.