Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 10:35 IST2019-03-08T10:27:12+5:302019-03-08T10:35:50+5:30
महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं.

Women's Day Special : महिलांच्या आरोग्यावर सतत असते 'या' आजारांची टांगती तलवार!
(Image Credit : www.mydr.com.au)
महिला या परिवाराचं केंद्र असतात. पण नेहमीच स्वत: त्या आणि इतरही लोक त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असतात. हे चित्र केवळ भारतातच नाही तर जगभरात बघायला मिळतं. महिलांच्या आरोग्याला प्राथमिकता न दिलं जाण्याला अनेक कारणे आहेत. यात सामाजिक व्यवस्था, आर्थिक स्वातंत्र्य, माहितीचा अभाव या गोष्टी सांगता येतील. त्यामुळे महिलांना नेहमीच काही आजारांचा सामना करावा लागतो. अशाच काही आजारांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आज जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना सामना कराव्या लागणाऱ्या आजारांची माहिती घेऊया.
मासिक पाळीसंबंधी समस्या
मासिक पाळी स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. याची सुरूवात किशोरावस्थेत होते. यादरम्यान मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी आणि नंतर महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाचा याकडे बघण्याचा संकुचित दृष्टीकोन आणि याबाबतचं अज्ञान यामुळे या वेदना अधिक वाढतात. यामुळे महिलांना अनेक गंभीर आजारांचा आणि इन्फेक्शनचा सामना करावा लागतो.
प्रेग्नेंसी डिप्रेशन
ही सृष्टी पुढे नेण्याची जबाबदारी सुद्धा स्त्रियांवर आहे, त्यामुळे आई होण्याचा आनंद आणि त्रास दोन्हींचा सामना त्यांना करावा लागतो. प्रेग्नेंसी आणि डिलिव्हरीचा त्रास कदाचित इतका होत नसेल पण त्यानंतर येणारं डिप्रेशन फार त्रासदायक ठरतं. जर परिवाराचा पाठींबा आणि वेळेवर उपचार मिळाले नाही तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.
सर्वाइकल कॅन्सर
सर्वाइकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा महिलांच्या योनीमार्गात अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर "ह्युमन पपिल्लोमा व्हायरस'(एचपीव्ही) या विषाणू द्वारे होणारा कर्करोग आहे. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठिण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. अशा परिस्थितीत उपचारपद्धती अयशस्वी होऊन काही काळातच रुग्ण दगावतो. एका रिसर्चनुसार, जगभरात दरवर्षी ५ लाख या कॅन्सरची प्रकरणे समोर येतात. यात २७ टक्के केवळ भारतातील महिलांचा समावेश आहे.
ब्रेस्ट कॅन्सर
एनबीटीने एका सर्व्हेचा हवाला देत माहिती दिली की, भारतात प्रत्येक आठपैकी एका महिलेला स्तनाचा कर्करोग आहेय तज्ज्ञांनी इशारा दिली आहे की, हा आजार होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वय वाढण्यासोबतच या समस्येचा धोका अधिक वाढतो. यासाठी आनुवांशिक कारण मुख्य मानलं जातं. या आजाराचं योग्यवेळी निदान झालं तर सर्जरी आणि कीमोथेरपीने उपचार शक्य आहे. मात्र जागरूकतेची कमतरता यामुळे महिलांसाठी हा जीवघेणा कॅन्सर आहे.
मेनॉपॉज
सामान्यपणे ५० वर्ष पार केलेल्या महिलांमध्ये आई होण्याची क्षमता राहत नाही आणि त्यांच्यात मासिक पाळीची प्रक्रिया सुद्धा बंद होते. या स्थितीला मेनॉपॉज म्हणतात. पण ही स्थिती सुरू होण्यापूर्वी आणि नंतर महिलांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. यात अनियमित रक्तस्त्राव, झोप न होणे, चिडचिडपणा, वजन वाढणे, केसगळती यांचा समावेश आहे. वेळेवर योग्य उपाय केले गेले नाही तर महिलांना हृदयासोबतच इतरही गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो.
व्हिटॅमिन डी ची कमतरता
एका सर्व्हेनुसार, भारतातील ७४ टक्के महिलांना व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्याच्या समस्येने ग्रस्त आहेत. याचं मुख्य कारण योग्य आहार न घेणे आणि खराब जीवनशैली आहे. व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे महिलांना ऑस्टियोपोरोसिस, डायबिटीज, पायांना सूज या समस्यांचा सामना करावा लागतो.
प्रमाणापेक्षा जास्त तणाव
ही विकसित आणि विकसनशील समाजाची समस्या आहे. जास्तीत जास्त महिला घरात आणि बाहेर दोन्हीकडे काम करतात. घरातील काम केवळ त्यांचीच जबाबदारी मानली जाते. बाहेरचं काम इतरांच्या दबावामुळे त्यांना करावं लागतं. यामुळे त्यांना डिप्रेशन, एंग्जायटी, डायबिटीजसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.