गर्भाशयातील गाठी ठरताहेत गर्भधारणेसाठी अडथळा, तरुणांचे पहिले प्राधान्य करिअरला, नंतर लग्नाचा विचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2023 12:04 IST2023-08-29T12:03:57+5:302023-08-29T12:04:21+5:30
उशिरा लग्न, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींमुळे महिलांमध्ये गर्भधारणेस अडथळा येत असल्याचे दिसून आले आहे.

गर्भाशयातील गाठी ठरताहेत गर्भधारणेसाठी अडथळा, तरुणांचे पहिले प्राधान्य करिअरला, नंतर लग्नाचा विचार
मुंबई : गेल्या काही वर्षात आपल्याकडे लग्न करण्याचे वय तिशीच्या पलीकडे गेले आहे. तरुण आणि तरुणी सध्या पहिले करिअरला प्राधान्य देत असून नंतर लग्नाचा विचार करताना दिसतात. उशिरा लग्न, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंग या सगळ्या गोष्टींमुळे महिलांमध्ये गर्भधारणेस अडथळा येत असल्याचे दिसून आले आहे.
तसेच या सगळ्या प्रक्रियेत गर्भाशयात जर गाठी (फायब्रॉइड्स) आढळल्या तर त्यांना गर्भधारणा करताना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकवेळा त्या गाठी काढल्यानंतर गर्भधारणा होते. या गाठीचा आकार इतका मोठा असतो की यामुळे महिलांचे पोट फुगलेले दिसते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
शस्त्रक्रियेसाठी लॅप्रोस्कोपी
गर्भाशयातील गाठी ही एक सामान्य समस्या आहे. अनेक महिला या समस्येला सामोऱ्या जातात.
गर्भाशयात आतील बाजूला गाठ असेल तर ती फार लवकर लक्षात येत नाही. तसेच त्यामुळे पोट फुगत नाही. गाठ बाहेरून असेल तर त्यामुळे पोट फुगते.
या गाठी ४ मिलीमीटरपेक्षा अधिक मोठ्या असतील तर त्या शस्त्रक्रिया करून काढून काढाव्या लागतात.
अनेक महिलांमध्ये या गाठी असल्याने गर्भधारणा होत नाही. सध्याच्या घडीला अत्याधुनिक शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कोपीचा उपयोग केला जातो. यामध्ये टाके घ्यावे लागत नाही. त्यामुळे रुग्णाचा हॉस्पिटलमध्ये राहण्याचा कालावधी कमी होतो.
काय असतात कारणे?
लठ्ठपणा
हार्मोम्सचे असंतुलन
अनुवंशिकता
लक्षणे\
पोटात वेदना होणे
ओटीपोटात दुखणे
मासिकपाळीच्या वेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव
मूत्राशयाचा संसर्ग
अंगावरून जाणे
अनियमित पाळी
कंबरदुखी
या गाठी गर्भाशयात कुठे आहे यावरून त्याचे निदान करून त्याची उपचारपद्धती निश्चित केली जाते. तसेच शस्त्रक्रिया कोणत्या आणि कशा पद्धतीने करायचे ठरविले जाते. गर्भधारणेस अडथळा निर्माण करणाऱ्या या गाठी काढल्यानंतर अनेक महिलाची गर्भधारणा व्यवस्थित झाली आहे. या गाठीचा आकार छोट्या बी पासून ते कलिंगडाएवढा कितीही असू शकतो. याकरिता लवकर निदान करून त्यावर उपचार करणे हा एकमेव उपाय आहे. गाठीच्या आजारावर उपाय करून रुग्ण व्यवस्थित होतो. त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही.
- डॉ. आरती अढे, स्त्री रोग तज्ज्ञ, हिंदुजा हॉस्पिटल