कानात मळ जमा होणे ही  एक सामान्य गोष्ट आहे. आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच ही समस्या उद्भवते. धूळ, माती किंवा आंघोळ करताना साबण कानामध्ये गेल्यामुळे अनेकदा कानाच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे वेळोवेळी कानांची स्वच्छता करणंही गरजेचे असतं. योग्यप्रकारे स्वच्छता न झाल्यास किंवा कानात जास्त मळ जमा झाल्यास कान दुखणे, खाज येणे, जळजळ होणे, कमी ऐकायला येणे अशा समस्या होऊ शकतात. 

(Image Credit : newsnetwork.mayoclinic.org)

अनेकजण कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्सची मदत घेतात. लोकांचा असा समज असतो की, यामुळे कानांची स्वच्छ उत्तम प्रकारे करणं सहज शक्य होतं. पण असं करणं खरचं घातक ठरू शकतं. तुम्हीही कानांच्याबाबतीत असचं काहीसं करत असाल तर वेळीच असं करणं थांबवा. जाणून घेऊया इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ केल्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत...

1. इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ केल्यामुळे कानात जमा झालेला मळ बाहेर येण्याऐवजी कानाच्या आतमध्ये जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे कानांच्या नाजूक पडद्याला नुकसान पोहोचते. यामुळे ऐकायलाही त्रास होतो. 

2. इयर बड्सवर कापूस लावण्यात आलेला असतो. अनेकदा तर कापसाचा काही भाग आतमध्ये राहतो आणि आंधोळीदरम्यान पाणी गेल्यामुळे तो कापूस ओला होत राहतो. परिणामी कानाच्या आतमध्ये फंगल इन्फेक्शन होतं. 

3. इयर बड्सचा दररोज वापर केल्यामुळे कानाच्या आतील त्वचेलाही नुकसान पोहचू शकतं. कारण कानाच्या आतमध्ये असलेली त्वचा तुलनेने अत्यंत संवेदनशील असते. 

4. कानामध्ये नैसर्गिकपणे एक द्रव्य तयार होत असतं. हे चिकट द्रव्य कानामध्ये तयार होणारा मळ कानाच्या पडद्यापर्यंत पोहचू देत नाही. जेव्हा आपण इयर बड्सचा वापर करून कान स्वच्छ करतो त्यावेळी कानातील हे द्रव्यही निघून जातं. ज्यामुळे धूळ, माती कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचते. 

5. कानाच्या आत असणारा पडदा किती लांब आहे हे आपल्याला माहीत नसतं. अशातच आपण जेव्हा इयर बड्स कान स्वच्छ करण्यासाठी वापरतो त्यावेळी तो आतपर्यंत जाऊन कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचवू शकतो. 

6. कान स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इयर बड्सवर असणाऱ्या कापसावर अनेक बॅक्टेरिया असतात. ज्यावेळी आपण कान स्वच्छ करण्यासाठी इयर बड्सचा वापर करतो त्यावेळी हे बॅक्टेरिया कानाच्या आतपर्यंत जावून इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. 


Web Title: Using earbuds it can cause some damage ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.