उभं राहून काम केल्याने हृदयरोगाचा धोका टळतो असं वाटतं? करताय मोठी चूक, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 11:28 IST2024-10-19T11:27:58+5:302024-10-19T11:28:43+5:30
Standing On Desk : अनेकांना वाटतं की, बसून काम केल्याने वजन वाढतं, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्याचाही धोका असतो. अशात उभे राहून काम केल्याने हे धोके टाळले जाऊ शकतात.

उभं राहून काम केल्याने हृदयरोगाचा धोका टळतो असं वाटतं? करताय मोठी चूक, वेळीच व्हा सावध!
Standing On Desk : ऑफिसमध्ये एका जागी बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये आता डेस्कसमोर उभं राहून करण्याचं चलन वाढत आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की, एकाजागी बसून काम केल्याने शरीरात निष्क्रियता येते, अशात काही तास उभे राहून काम केल्याने ती भरून निघते. अनेकांना वाटतं की, बसून काम केल्याने वजन वाढतं, स्ट्रोक आणि हार्ट फेल होण्याचाही धोका असतो. अशात उभे राहून काम केल्याने हे धोके टाळले जाऊ शकतात.
मात्र, अशा विचार करणाऱ्या लोकांसाठी एक चिंताजनक रिसर्च समोर आला आहे. ज्यानुसार उभं राहून काम केल्याने फायदा तर सोडाच उलट शरीराचं गंभीर नुकसान होतं. रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, उशीरापर्यंत डेस्कसमोर उभं राहून काम केल्याने पायांच्या नसांमध्ये सूज येते आणि रक्ताच्या गाठी तयार होण्याचा धोकाही वाढतो.
हा रिसर्च ब्रिटनच्या 80 हजार लोकांवर करण्यात आला आहे. ज्यातून समोर आलं की, उभं राहून काम केल्याने स्ट्रोक आणि हार्ट फेलिअरचा धोका कमी होत नाही.
सिडनी विश्वविद्यालयाकडून करण्यात आलेल्या या रिसर्चमध्ये असं आढळलं की, दिवसा दोन तासांपेक्षा जास्त वेळ उभं राहिल्याने डीप वेन थ्रोम्बोसिस आणि व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांचा धोका वाढतो.
रिसर्चच्या लेखकांनी सांगितलं की, 'सगळ्यात महत्वाची बाब ही आहे की, फार जास्त वेळ उभे राहिल्याने गतिहीन लाइफस्टाईलमध्ये कोणतीही सुधारणा होत नाही आणि याने काही लोकांमध्ये रक्तप्रवाहाची समस्या होते. रिसर्चमधून समोर आलं की, जास्त वेळ उभे राहिल्याने हृदयासंबंधी आरोग्यात काही सुधारणा होत नाही आणि रक्तप्रवाहासंबंधी समस्यांचा धोका वाढतो'.
रिसर्चच्या सुरूवातीला यात सहभागी लोकांना हृदयरोग नव्हता. त्यांच्या शारिरिक हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्या मनगटावर डिवाइस बांधण्यात आलं. अभ्यासकांना आढळलं की, दोन तासांपेक्षा जास्त उभे राहिल्याने दर 30 मिनिटांसाठी रक्तप्रवाहासंबंधी आजाराचा धोका 11 टक्के वाढतो.
डेस्क जॉबवाल्यांनी काय करावे?
सिडनी विश्वविद्यालयामध्ये मॅकेंजी वेअरेबल्स रिसर्च हब चे प्रोफेसर इमॅनुएल स्टामाटाकिस म्हणाले की, जे लोक नियमितपणे जास्त वेळ बसून काम करतात. त्यांनी कामाच्या अधून-मधून उठत राहिलं पाहिजे आणि नियमितपणे व्यायाम केला पाहिजे. जेणेकरून हृदयरोगाचा धोका कमी होईल. नियमितपणे कामातून ब्रेक घ्या. पायऱ्यांचा वापर करा. जेवण झाल्यावर काही मिनिटे वॉक करा.