Painkiller's Side effects: पेनकिलरमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, संशोधनातून आणखीही धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2022 18:03 IST2022-02-24T17:48:48+5:302022-02-24T18:03:00+5:30
पेनकिलर असं सतत घेणं हे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. तुमचा मेंदू, हृदय आणि श्वसनयंत्रणेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात.

Painkiller's Side effects: पेनकिलरमुळे होऊ शकतो 'हा' गंभीर आजार, संशोधनातून आणखीही धक्कादायक खुलासे
आपल्या घरात किंवा बॅगेत पेनकिलरची गोळी हमखास असतेच. कोरोना काळात तर त्याचं प्रमाण जास्त वाढलं आहे. थोडंसं डोकं दुखलं किंवा हात-पाय जड झाले तर पॅरासिटॅमॉल अथवा दुसरी एखादी पेन किलर घरच्या घरी घेण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे दुखणं लगेच कमी होत असल्यामुळे हे वारंवार केलं जातं.
पेनकिलर असं सतत घेणं हे आरोग्यासाठी अत्यंत हानीकारक आहे. तुमचा मेंदू, हृदय आणि श्वसनयंत्रणेवर दीर्घकालीन दुष्परिणाम होऊ शकतात. रिट्रीट बिहेविअर हेल्थ या वेबसाईटनं याबाबत एक रिपोर्ट जाहीर केला. या अहवालानुसार पेनकिलरच्या अतिवापरामुळे मेंदूत चुकीचे संदेश जातात. त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव, धाप लागणं अशा समस्या उद्भवतात. याशिवाय पोटाचे विकार, हार्मोनल इम्बॅलन्स सारखे दीर्घकालीन आजारही जडतात.
पेनकिलरच्या हृदयावर होणा-या परिणामांबाबत युनिव्हर्सिटी ऑफ माँट्रीयल हॉस्पिटल रिसर्च सेंटरनं संशोधन केलंय. त्यानुसार काही पेनकिलर घेतल्यामुळे हृदयविकाराचा धोका लक्षणीयरित्या वाढू शकतो, असं स्पष्ट झालं आहे.
सातत्यानं पेनकिलर घेतल्यामुळे फफ्फुसांची कार्यक्षमता घटण्याचा धोका असतो. त्यामुळे न्यूमोनियासारखे जीवघेणे आजारही होऊ शकतात. कोणतंही दुखणं सहन करायची शरीराची ठराविक क्षमता असते. त्यापुढे उपचारांची गरज पडते. मात्र अशी वेळ आलीच, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानंच औषधं घेतली पाहिजेत. घरच्या घरी केलेले तात्पुरते उपचार हे दीर्घकालीन गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकतात.