केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 06:16 IST2025-09-29T06:16:19+5:302025-09-29T06:16:46+5:30
खेळ, विज्ञान, राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली असली तरी फिटनेसच्या बाबतीत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे.

केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
नवी दिल्ली : खेळ, विज्ञान, राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली असली तरी फिटनेसच्या बाबतीत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. केंद्र सरकारच्या ‘टाइम यूज सर्व्हे’तून हे उघड झाले आहे की १५ ते २९ वयोगटातील केवळ ३.९ टक्के तरुणी रोज व्यायाम करतात, तर त्याच वयोगटातील पुरुषांमध्ये ही संख्या तब्बल १४.८ टक्के आहे. केंद्र सरकारने देशभरातील ४,५०,००० लोकांमध्ये केलेल्या सर्वेक्षणात फिटनेस जागरूकतेमध्ये पुरुष व महिलांमधील ही महत्त्वपूर्ण तफावत उघड झाली आहे.
आरोग्यावर होतो गंभीर परिणाम
नियमित व्यायाम न केल्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, हृदयविकार आणि नैराश्य वाढते. व्यग्र जीवनशैलीत एकदा व्यायामाची सवय सुटली की ती परत लावणे कठीण होते. त्यामुळे हा मुद्दा केवळ लिंग-समानतेशी मर्यादित न राहता राष्ट्रीय आरोग्याशी निगडित ठरतो.
संधीमधील तफावत स्पष्ट
सर्व्हेच्या निष्कर्षानुसार, महिलांचा सरासरी व्यायाम कालावधी ४६ मिनिटांचा आहे, तर पुरुषांचा ६४ मिनिटांचा आहे. यावरूनही महिलांचा फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि उपलब्ध संधींतील तफावत स्पष्ट होते.
महिलांचा सहभाग का कमी?
सुरक्षित सार्वजनिक जागांची कमतरता : उद्याने, मैदाने पुरुषांनी व्यापलेली असतात. सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा बाहेर पडणे धोकादायक वाटते.
संधींचा अभाव : मुलांना जिम आणि फिटनेससाठी प्रोत्साहन दिले जाते, पण मुलींवर किशोरावस्थेनंतर घराबाहेरच्या पडण्यावर बरीच बंधने येतात.
कौटुंबिक जबाबदाऱ्या : घरकाम, अभ्यास व जबाबदारी असल्याने व्यायामाला वेळ मिळत नाही.
सामाजिक मानसिकता : मुलींचा व्यायाम हा अजूनही ‘प्राथमिकता’ मानला जात नाही.
कोणते बदल आवश्यक?
सुरक्षित पायाभूत सुविधा : उजेड असलेली उद्याने, महिलांसाठी स्वतंत्र किंवा सामुदायिक जिम सुरू करणे.
शैक्षणिक स्तरावर प्रोत्साहन : शाळा-काॅलेजात विद्यार्थ्यांसोबत विद्यार्थिनींसाठीही खेळ अनिवार्य करणे.
कौटुंबिक पाठबळ : लहानपणापासूनच मुलींना योग, क्रीडा प्रकार, व्यायामासाठी प्रोत्साहित करणे.
जागरूकता मोहिमा : कुटुंब आणि समाजात महिलांच्या फिटनेससाठी व्यायाम, धावणे, जिम, टीम स्पोर्ट्स यांचा प्रचार-प्रसार करणे.