अरे बाप रे! वर्षाला तब्बल ५२ हजार प्लास्टिकचे कण करतो आपण गिळंकृत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2019 10:21 IST2019-06-06T10:10:59+5:302019-06-06T10:21:40+5:30
प्लास्टिकमुळे पृथ्वीचं, पर्यावरणाचं, जनावरांचं, समुद्री जीवांचं आणि ज्यांनी प्लास्टिकची निर्मिती केली त्या मनुष्यांचं जगणं कसं बेजार झालं आहे हे वेळोवेळी बघायला मिळत आहे.

अरे बाप रे! वर्षाला तब्बल ५२ हजार प्लास्टिकचे कण करतो आपण गिळंकृत
(Image Credit : Active.com)
प्लास्टिकमुळे पृथ्वीचं, पर्यावरणाचं, जनावरांचं, समुद्री जीवांचं आणि ज्यांनी प्लास्टिकची निर्मिती केली त्या मनुष्यांचं जगणं कसं बेजार झालं आहे हे वेळोवेळी बघायला मिळत आहे. अशात प्लास्टिक वेस्ट कशाप्रकारे आपल्या आरोग्याला थेट नुकसान पोहोचवतंय, याचं एक विश्लेषण समोर आलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, दरवर्षी जेवण आणि श्वासांच्या माध्यमातून हजारो मायक्रोप्लास्टिक कण मानवी शरीरात प्रवेश करत आहेत. या रिपोर्टसोबतच पुन्हा एकदा हा प्रश्न उभा ठाकला आहे की, प्लास्टिक वेस्ट आपल्यासाठी किती नुकसानकारक आहे?
मानव निर्मित उत्पादनांपासून तुटून तयार होतात माक्रोप्लास्टिक कण
मायक्रोप्लास्टिक हे प्लास्टिकचे ते सूक्ष्म कण आहेत जे मानव निर्मित उत्पादन जसे की, सिथेंटिक कपडे, टायर आणि कॉन्टॅक्ट लेन्स इत्यादींपासून तुटून तयार होतात. मायक्रोप्लास्टिक पृथ्वीवर प्रत्येक ठिकाणी असलेल्या वस्तूंपैकी एक आहे. हे कण जगातल्या सर्वात उंच ग्लेशिअर्स आणि समुद्राच्या सर्वात खोल तळातही आढळतात. याधीच्या काही रिसर्चमधून हे स्पष्ट झालं आहे की, कशाप्रकारे मायक्रोप्लास्टिक मानवाच्या खाद्य पदार्थांमध्ये सामिल होऊ शकतं. एका रिसर्चनुसार, जवळपास सर्वच प्रमुख बॉटलबंद पाणी ब्रॅन्ड्सच्या नमून्यांमध्येही मायक्रोप्लास्टिक आढळलं होतं.
प्रदूषित हवेचा समावेश केल्यास आकडा वाढतो
या रिसर्चमध्ये कॅनडाच्या वैज्ञानिकांनी मायक्रोप्लास्टिक contamination वर शेकडो आकड्यांचं विश्लेषण केलं आणि त्याची तुलना अमेरिकन लोकांच्या आहाराशी आणि त्यांच्या लाइफस्टाइलच्या सवयींशी केली. यातून त्यांना असं आढळलं की, दरवर्षी एक वयस्क पुरूष ५२ हजार मायक्रोप्लास्टिक कण गिळंकृत करू करतो. ज्या प्रदूषित वातावरणात आपण श्वास घेतो, जर त्याचाही यात समावेश करण्यात आला तर ही आकडेवारी वाढून १ लाख २१ हजार कणांपर्यंत पोहोचते.
बॉटलचं पाणी पिणाऱ्यांमध्ये अतिरिक्त ९० हजार मायक्रोप्लास्किट कण
एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅन्ड टेक्नॉलॉजी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, जर एखादी व्यक्ती केवळ बॉटलचं पाणी पित असेल तर त्याच्या शरीरात दरवर्षी अतिरिक्त ९० हजार मायक्रोप्लास्टिकचे कण पोहोचू शकतात. रिसर्चच्या लेखकांनी सांगितले की, त्यांची आकडेवारी केवळ एक अंदाज आहे. एखादी व्यक्ती प्लास्टिकचं किती सेवन करते हे ती व्यक्ती कुठे राहते आणि काय खाते यावर अवलंबून आहे.
आरोग्यावर काय प्रभाव पडतो याची माहिती नाही
या मायक्रोप्लास्टिक कणांचा मनुष्याच्या शरीर आणि आरोग्यावर काय प्रभाव पडतो याबाबत अजून काही निश्चित माहिती समोर आलेली नाही. पण हे नक्की की, १३० मायक्रोमीटरपेक्षा छोटे मायक्रोप्लास्टिकचे कण व्यक्तीच्या टिशूमध्ये जाऊन इम्यूनिटीला प्रभावित करतात. पण रिसर्चमध्ये ज्या मायक्रोप्लास्टिक कणांबाबत बोललं जात आहे, त्याने मनुष्याच्या आरोग्याचं किती नुकसान होतं याचे ठोस पुरावे अजून मिळाले नाहीत.