केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 05:51 IST2025-10-03T05:51:03+5:302025-10-03T05:51:28+5:30
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतात साठणारी चरबी (लिव्हर फॅट) ही गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते, असा इशारा इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे.

केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
तेल अवीव : केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतात साठणारी चरबी (लिव्हर फॅट) ही गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरू शकते, असा इशारा इस्रायलमधील शास्त्रज्ञांनी दिला आहे. तेल अवीव विद्यापीठ व ‘डाना ड्वेक चिल्ड्रन्स हॉस्पिटल’ यांनी केलेल्या अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, ज्यांच्या यकृतात चरबीचे प्रमाण जास्त आहे, अशा मुलांना पुढे जाऊन टाइप-२ मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लिव्हर सिरोसिससारख्या आजारांचा धोका अधिक असतो.
अभ्यासात ३१ लठ्ठ मुलांची तपासणी करण्यात आली. आजारांचे लक्षण दिसलेल्या मुलांच्या यकृतात सरासरी १४ टक्के चरबी आढळली, तर निरोगी मुलांमध्ये ती फक्त ६ टक्के होती. विशेष म्हणजे, दोन्ही गटांमध्ये आंतरिक चरबी (विसरल फॅट) किंवा इतर घटक समान होते; मात्र फरक केवळ यकृतातील चरबीच्या प्रमाणात फरक दिसून आला. संशोधन पथकाने एमआरआय स्कॅनद्वारे वेदनारहित पद्धतीने हे मोजमाप केले.
मुख्य धोका : मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सिरोसिस
कारणीभूत घटक : अति सोडियम, प्रोसेस्ड फूड, संतृप्त चरबी
आहाराची गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता
> या निष्कर्षातून असे समोर आले की फक्त वजन कमी करणे पुरेसे नाही, तर आहारातील गुणवत्ता सुधारण्याची आवश्यकता आहे.
> आजारांची लक्षणे असलेल्या मुलांमध्ये सोडियम, प्रोसेस्ड फूड व संतृप्त चरबीचे सेवन अधिक असल्याचे आढळले.
> तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्ये, मासे, ऑलिव्ह तेल व सुका मेवा यांचा समावेश करणे अधिक आरोग्यदायी ठरेल.