काळजी वाढली! महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना 

By manali.bagul | Published: October 1, 2020 01:03 PM2020-10-01T13:03:01+5:302020-10-01T13:08:08+5:30

Congo fever in maharashtra : या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताशी, घामाशी किंवा अवयव व शरीराशी इतरांचा संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.

Maharashtra palghar district is on alert over congo fever know about this fever and symptoms | काळजी वाढली! महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना 

काळजी वाढली! महाराष्ट्रात होतोय भयंकर काँगो फीव्हरचा प्रसार; डॉक्टरांनी दिल्या 'या' महत्वाच्या सूचना 

Next

कोरोना व्हायरसनं गेल्या अनेक महिन्यांपासून कहर केला आहे. मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता  महाराष्ट्रात अजून एका घातक आजारानं मान वर काढायला सुरूवात केली आहे. त्यानंतर पालघर जिल्हा प्रशासनानी मंगळवारी क्रेमियन काँगो हेमोऱ्हागिक फीव्हर (Crimean Congo Hemorrhagic Fever CCHF) म्हणजेच काँगो तापाचा प्रसार होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. यासह नागरिकांना सर्तकतेचं आवाहन केलं आहे. 

गुजरातमधील काही जिल्ह्यात या आजाराचा प्रसार झाला असून महाराष्ट्रातही या आजाराचा प्रसार होऊ शकतो असे पालघर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. प्रशांत डी. कांबळे यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात देण्यात सांगण्यात आले आहे. या परिपत्रकात या आजारापासून लांब राहण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी,  लक्षणं काय आहेत. तसंच हा आजार कशामुळे पसरतो याबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या काँगो तापाबद्दल महत्वाच्या गोष्टी.

काँगो हा आजार गोचिडीच्या संपर्कात आलेल्या माणसाला होऊ शकतो. गोचीडीपासून हवेत प्रसारित होणाऱ्या Bunyaviridae family या वर्गातल्या Nairovirus नावाच्या विषाणूपासून माणसाला हा आजार होऊ शकतो. गोचिडी पशुपालनातील पाळीव प्राण्यांच्या अंगावर असते. त्यामुळे सावधगिरी बाळगायला हवी असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे. 

कसा पसरतो हा आजार

गोचिड चावल्यामुळे किंवा हा आजार झालेल्या जनावराच्या रक्ताचा संपर्क आल्याने लगेचच ज्या पेशी माणसाच्या शरीरावर राहतात त्यांच्या संपर्कात आल्याने या विषाणूचं माणसात संक्रमण होऊ शकतं. आतापर्यंत हा आजार झालेल्यांमध्ये जनावरांशी संबंधित व्यवसाय करणार म्हणजे शेतकरी, पशूपालक, कत्तलखान्यातील कामगार आणि पशुतज्ज्ञ मोठ्या प्रमाणात समावेश होता अशी माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. 
या आजाराच्या रुग्णाच्या रक्ताशी, घामाशी किंवा अवयव व शरीराशी इतरांचा संपर्क आल्यास या आजाराचा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो.

या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने अफ्रिका, बाल्कन प्रदेश, मध्यपूर्वेतील आणि आशियातील देशांमध्ये झाल्याचं दिसून आलं आहे.गोचीड चावल्यास आजार झाला तर त्याचा इनक्युबेशन काळ 3 ते जास्तीत जास्त 9 दिवस असतो. रुग्णाच्या रक्ताच्या किंवा पेशींच्या संपर्कात आल्याने याची लागण झाली तर इनक्युबेशन काळ 5 ते 6 दिवसांपासून 13 दिवसांपर्यंत असतो.

लक्षणं

डोकेदुखी, डोळे चुरचुरणं, प्रखर प्रकाशाचा त्रास होणं, उलट्या, जुलाब, ओटीपोटात दुखणं, अंग जड होणं, मानदुखी, अंगदुखी, पाठदुखी, सतत ताप येणं, सतत झोप येणं. ही या आजाराची प्रमुख लक्षणं आहेत. काँगो तापाचा मृत्यूदर 30 टक्के असून, हा रुग्ण आजार झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता असते. वेळेत उपचार घेतल्यास हे टाळता येऊ शकतं. विशेष म्हणजे या आजारावर कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही.  रिबाव्हिरिन (Ribavirin) हे  औषध या संसर्गावर उपचार करताना उपयोगी पडल्याचं दिसून आलं आहे. औषध तोंडाद्वारे आणि इंजेक्शनच्यामार्फत लसेतून दिलं तरीही परिणामकारक ठरतं. 

Web Title: Maharashtra palghar district is on alert over congo fever know about this fever and symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.