सर्व्हायकल कॅन्सरपासून तरुणींचे संरक्षण करूया 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 09:33 IST2026-03-23T09:32:42+5:302026-03-23T09:33:16+5:30

दरवर्षी हजारो महिलांचे प्राण वाचू शकतात.

let us protect young women from cervical cancer | सर्व्हायकल कॅन्सरपासून तरुणींचे संरक्षण करूया 

सर्व्हायकल कॅन्सरपासून तरुणींचे संरक्षण करूया 

डॉ. नंदिता पालशेतकर, स्त्रीरोगतज्ज्ञ

भारतातील महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगांपैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग (सर्व्हायकल कॅन्सर) मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. हा कर्करोग टाळता येण्यासारखा आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारचा ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ लसीकरणाचा निर्णय एक महत्त्वाचा उपक्रम आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो महिलांचे प्राण वाचू शकतात.

गर्भाशय मुखाचा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ या विषाणूच्या काही विशिष्ट प्रकारांच्या दीर्घकालीन संसर्गामुळे होतो. एचव्हीपीचे अनेक प्रकार असले, तरी ‘एचपीव्ही १६’ आणि ‘एचपीव्ही १८’ हे प्रकार जवळपास ७० ते ८० टक्के प्रमाणात गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात. एचपीव्ही संसर्ग खूप सामान्य आहे. तो प्रामुख्याने लैंगिक जीवनाची सुरुवात झाल्यानंतर होऊ शकतो. बहुतांश महिलांमध्ये हा संसर्ग आपोआप बरा होतो; परंतु काही महिलांमध्ये तो कायम राहून हळूहळू पूर्वकर्करोगीय बदल निर्माण करतो आणि पुढे कर्करोगात रूपांतरित होतो. ही प्रक्रिया साधारणपणे १५ ते २० वर्षे चालू शकते. त्यामुळे लसीकरण आणि तपासणीद्वारे प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला मोठी संधी असते. 

जर एचपीव्ही लस देशातील प्रत्येक मुलीला दिली गेली, तर भारतात दरवर्षी हजारो महिलांचे जीव वाचू शकतात. नियमित तपासणी आणि जनजागृतीसोबत हा उपक्रम राबवला गेला, तर पुढील काही दशकांत गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटू शकते. म्हणून एचपीव्ही लसीकरण सुरू करण्याचा सरकारचा निर्णय हा दूरदृष्टीचा आणि स्वागतार्ह आहे. आज मुलींना संरक्षण देणे म्हणजे उद्याच्या भारतीय महिलांसाठी निरोगी, सुरक्षित भविष्याची गुंतवणूक करणे होय, असे म्हणावे लागेल. 

दरवर्षी सुमारे ८० हजार महिला दगावतात

भारतात दरवर्षी सुमारे सव्वालाख महिलांना हा कर्करोग होतो आणि सुमारे ७५ ते ८० हजार महिलांचा या आजारामुळे मृत्यू होतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर  भारतात दर ७ ते ८ मिनिटांनी एका महिलेचा मृत्यू गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे होतो. ही धक्कादायक आकडेवारी या आजाराविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक उपायांची तातडीची गरज अधोरेखित करते.

कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात स्क्रीनिंग (तपासणी) हे महत्त्वाचे साधन आहे. मी ‘फेडरेशन ऑफ ऑब्स्टॅट्रिक अँड ग्यानकॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेची अध्यक्ष असताना, देशभरात तपासणीचा व्यापक उपक्रम सुरू केला होता. देशभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांच्या प्रयत्नांमुळे तीन लाखांहून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली. अशा कार्यक्रमांमुळे कर्करोगाचे लवकर निदान होऊन अनेकींचे जीव वाचू शकतात.

लवकर निदानापेक्षा प्रतिबंध  प्रभावी ठरतो. त्यामुळेच एचव्हीपी लसीचे महत्त्व अधोरेखित होते. ही लस गर्भाशय मुखाच्या कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या एचपीव्हीविरुद्ध ९० टक्क्यांहून अधिक संरक्षण देते. विशेषतः ९ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना, विषाणूचा संपर्क होण्यापूर्वी ही लस दिल्यास गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होऊ शकतो.

एचपीव्ही लसीबाबत सुरक्षिततेचा मुद्दाही महत्त्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांत जगभरात कोट्यवधी डोस देण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्थांच्या निरीक्षणानुसार ही लस सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचे सिद्ध झाले आहे. ही नॉन-लाइव्ह लस असल्यामुळे ती एचपीव्ही संसर्ग निर्माण करू शकत नाही.

Web Title : सर्वाइकल कैंसर से युवतियों का बचाव: एक महत्वपूर्ण पहल

Web Summary : सर्वाइकल कैंसर को रोकने के लिए एचपीवी टीकाकरण महत्वपूर्ण है, जो भारतीय महिलाओं में मृत्यु का एक प्रमुख कारण है। प्रारंभिक टीकाकरण (9-14 वर्ष) और नियमित जांच से बीमारी के प्रसार को काफी कम किया जा सकता है, जिससे सालाना हजारों लोगों की जान बचाई जा सकती है। सरकार की पहल महिलाओं के लिए एक स्वस्थ भविष्य की ओर एक स्वागत योग्य कदम है।

Web Title : Protecting young women from cervical cancer: A vital initiative

Web Summary : HPV vaccination is crucial for preventing cervical cancer, a leading cause of death among Indian women. Early vaccination (9-14 years) and regular screenings can significantly reduce the disease's prevalence, saving thousands of lives annually. The government's initiative is a welcome step towards a healthier future for women.