'ही' आहेत हाय ब्लडप्रेशरची कारणं, वेळीच व्हा सावध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 15:42 IST2019-12-18T14:34:47+5:302019-12-18T15:42:52+5:30
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तसंच वाढत्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे.

'ही' आहेत हाय ब्लडप्रेशरची कारणं, वेळीच व्हा सावध
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे तसंच वाढत्या प्रदूषणामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसंच दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे नकळतपणे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. आजकाल प्रत्येक व्यक्तीला रक्तदाबाशी निगडीत समस्या उद्भवतात.
हायपरटेंशन म्हणजेच हाई ब्लड प्रेशरचा आजार अनेक लोकांना उद्भवतो. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि झोपेच्या वेळा अनियमीत असल्यामुळे ही समस्या सर्वाधीक उद्भवते. रक्तदाबासंबंधी असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष केल्यास हार्टस्ट्रोक किंवा हृद्याशी संबंधीत आजार उद्धवण्याचा धोका अधिक असतो. तर मग जाणून घेऊया कोणत्या कारणामुळे हायब्लड प्रेशरची समस्या उद्भवते.
मद्यपान आणि धुम्रपान
धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींत उच्च रक्तदाबाचे प्रमाण अधिक असते. तंबाखूत निकोटिन आणि कार्बन मोनोक्साइड ही विषारी तत्त्वे असतात. यामुळे रक्तदाब वाढतो. धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या कठीण होतात. मद्यपान करणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण हे अधिक असते. जेव्हा रक्तवाहिन्या अरुंद आणि कठीण होतात, तेव्हा त्यातून रक्ताला ढकलण्यासाठी हृदयाला खूप जोर लावावा लागतो, परिणामत: रक्तवाहिन्यांचा दाब वाढतो, म्हणजेच रक्तदाब वाढतो.
मिठाचं सेवन अधिक करणे
नकळतपणे जेवताना जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील रक्तदाबाची समस्या वाढण्याचा धोका असतो. मिठात सोडियम जास्त प्रमाणात असल्यामुळे याचा नकारात्मक परीणाम हृद्यावर होत असतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावण्याची प्रक्रिया ही अति संवेदनशील होते आणि रक्तदाब वाढतो. जर अति रक्तदाब असलेल्या रुग्णाने आपल्या आहारात मिठाचे प्रमाण कमी केलं तर अशा रुग्णाचा रक्तदाबाची समस्या कमी होऊ शकते.
ताण-तणाव
आयुष्यात जर तुम्हाला जास्त ताण- तणावाच्या परिस्थीतीचा सामना करावा लागत असेल तर रक्तदाबाची समस्या अधिक उद्भवते. ताण-तणावामुळे आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यापासून बचाव करायचा असल्यास जितकं शक्य होईल तितकं आनंदी रहा.
बाहेरचे अन्नपदार्थ जास्त खाणे
आहारात मीठयुक्त पदार्थ उदा.वेफर्स, कुरकुरे, बर्गर जास्त प्रमाणात घेतले जातात. या चुकीच्या आहारसवयीमुळे उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. त्यासाठी ताजे अन्न खाण्याचा प्रयत्न करा. तेलकट पदार्थ खाणं टाळा.